हंगामी कर्णधार केएल राहुलचे अर्धशतक, अश्विनचे 46 धावांचे योगदान, जान्सनचे 4 बळी, रबाडा-ऑलिव्हिएरला प्रत्येकी 3 बळी
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया कसोटीत नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत खेळत असलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 202 धावांमध्ये खुर्दा झाला. हंगामी कर्णधार केएल राहुलचे अर्धशतक आणि सातव्या स्थानी फलंदाजीला उतरत 50 चेंडूत 46 धावांचे योगदान देणाऱया अश्विनची फटकेबाजी दिलासादायी ठरली. द. आफ्रिकेतर्फे युवा डावखुऱया मार्को जान्सनने अवघ्या 31 धावात 4 बळी घेतले तर रबाडा (17.1 षटकात 3-64), ऑलिव्हिएर (17 षटकात 3-64) यांनी प्रत्येकी 3 फलंदाजांना बाद केले. दिवसअखेर द. आफ्रिकेने 18 षटकात 1 बाद 35 अशी सुरुवात केली.
वांडरर्सवरील या लढतीत भारताची उपाहाराअखेर 3 बाद 53 तर चहापानाअखेर 5 बाद 146 अशी दाणादाण उडाली आणि नंतर तिसऱया सत्रात संघाचा डाव सर्वबाद 202 धावांमध्ये गुंडाळला गेला. हंगामी कर्णधार केएल राहुलने 133 चेंडूत 9 चौकारांसह सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले तर रविचंद्रन अश्विनने 50 चेंडूत 6 चौकारांसह 46 धावा जमवल्या. अन्य फलंदाज मात्र पुरते निष्प्रभ ठरले.
विराटच्या गैरहजेरीत केएल राहुलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, मयांक अगरवाल (26) पहिल्या गडय़ाच्या रुपात बाद झाल्यानंतर भारताला सातत्याने धक्के बसत राहिले. युवा डावखुरा जलद गोलंदाज जान्सनने अगरवालला यष्टीमागे काईल व्हेरेनकरवी झेलबाद करत या सामन्यातील पहिला बळी घेतला.
चेतेश्वर पुजारा (33 चेंडूत 3) पुन्हा एकदा बॅड पॅचमध्येच कायम राहिला तर अजिंक्य रहाणेला गोल्डन डकला सामोरे जावे लागले. डय़ुआन ऑलिव्हिएरने पुजाराला किंचीत उसळलेल्या चेंडूवर पॉईंटवर तैनात बवूमाकडे झेल देणे भाग पाडले. अगदी पुढील चेंडूवरच ऑलिव्हिएरने अजिंक्य रहाणेला बाद करत आणखी एक धक्का दिला. रहाणे हा ऑलिव्हिएरचा कसोटीतील 50 वा बळी ठरला.
उपाहारानंतर 3 बाद 53 वरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर केएल राहुल व हनुमा विहारी यांनी सावध सुरुवात केली. पण, रबाडाने विहारीला शॉर्ट लेगवरील डय़ुसेनकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. फलकावर 91 धावा असताना भारताने चौथा फलंदाज गमावला.
एकीकडे, ठरावीक अंतराने सहकारी फलंदाज बाद होत असताना केएल राहुलने एकेरी-दुहेरी धावा घेत खराब चेंडूंची प्रतीक्षा केली आणि अर्धशतक साजरे केले. मात्र, याच धावसंख्येवर तो बादही झाला. मार्को जान्सनच्या गोलंदाजीवर डीप फाईनवरील रबाडाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. अश्विन व पंत यांनी चहापानापर्यंत 5 बाद 146 पर्यंत नेले. पण, पंतही फार काळ टिकून राहू शकला नाही. त्या तुलनेत अश्विनने संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधत 46 धावांचे योगदान दिले. शेवटच्या टप्प्यात बुमराहने थोडीफार फटकेबाजी केली. तो 11 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर 18 षटकात 1 बाद 35 अशी सुरुवात केली. शमीने मॅरक्रमला 7 धावांवर पायचीत केले. कर्णधार एल्गार 57 चेंडूत 11 तर किगन पीटरसन 39 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिले. सिराजला चौथे षटक टाकताना पाय दुखावल्याने मैदान सोडावे लागले होते.
धावफलक
भारत पहिला डाव ः केएल राहुल झे. रबाडा, गो. जान्सन 50 (133 चेंडूत 9 चौकार), मयांक अगरवाल झे. व्हेरेन, गो. जान्सन 26 (37 चेंडूत 5 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. बवुमा, गो. ऑलिव्हिएर 3 (33 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. पीटरसन, गो. ऑलिव्हिएर 0 (1 चेंडू), हनुमा विहारी झे. डय़ुसेन, गो. रबाडा 20 (53 चेंडूत 3 चौकार), रिषभ पंत झे. व्हेरेन, गो. जान्सन 17 (43 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. पीटरसन, गो. जान्सन 46 (50 चेंडूत 6 चौकार), शार्दुल ठाकुर झे. पीटरसन, गो. ऑलिव्हिएर 0 (5 चेंडू), मोहम्मद शमी झे. व गो. रबाडा 9 (12 चेंडूत 1 चौकार), जसप्रित बुमराह नाबाद 14 (11 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मोहम्मद सिराज झे. व्हेरेन, गो. रबाडा 1 (6 चेंडू). अवांतर 16. एकूण 63.1 षटकात सर्वबाद 202.
गडी बाद होण्याचा क्रम
1-36 (मयांक, 14.1), 2-49 (पुजारा, 23.3), 3-49 (रहाणे, 23.4), 4-91 (विहारी, 38.4), 5-116 (केएल, 45.5), 6-156 (पंत, 53.4), 7-157 (शार्दुल, 54.6), 8-185 (शमी, 59.3), 9-187 (अश्विन, 60.5), 10-202 (सिराज, 63.1).
गोलंदाजी
रबाडा 17.1-2-64-3, ऑलिव्हिएर 17-1-64-3, लुंगी एन्गिडी 11-4-26-0, मार्को जान्सन 17-5-31-4, केशव महाराज 1-0-6-0.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार खेळत आहे 11 (57 चेंडूत 1 चौकार), एडन मॅरक्रम पायचीत गो. शमी 7 (12 चेंडूत 1 चौकार), किगर पीटरसन खेळत आहे 14 (39 चेंडूत 2 चौकार). अवांतर 3. एकूण 18 षटकात 1 बाद 35.
गडी बाद होण्याचा क्रम
1-14 (मॅरक्रम, 3.5).
गोलंदाजी
बुमराह 8-3-14-0, शमी 6-2-15-1, सिराज 3.5-2-4-0, शार्दुल 0.1-0-0-0.
विराट कोहली पाठदुखीमुळे दुसऱया कसोटीतून बाहेर
नियमित कर्णधार विराट कोहली पाठदुखी उद्भवल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे नाणेफेकीवेळी हंगामी कर्णधार केएल राहुलने स्पष्ट केले. विराट आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात खेळू शकेल, अशी आशा असल्याचे केएल राहुलने म्हटले. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी दि. 11 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.
कोहली खेळणार नसल्याने त्याच्याऐवजी अष्टपैलू हनुमा विहारीला संघात स्थान मिळाले. प्रदीर्घ कालावधीपासून बॅड पॅचमधून प्रवास करत असलेल्या विराट कोहलीला 100 कसोटी सामन्यांचा माईलस्टोन पार करण्यासाठी आणखी 2 कसोटी सामन्यांची आवश्यकता आहे. 33 वर्षीय विराटचा दि. 19 जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेत समावेश असून तेथे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे. भारतीय संघाचे कसोटी सामने पाहता, विराट वेळेत तंदुरुस्त झाल्यास फेब्रुवारीत लंकेविरुद्ध बेंगळूर येथे आपली 100 वी कसोटी खेळू शकेल.
…त्यानंतर कोहली एकाही पत्रकार परिषदेला नाही…
दक्षिण आफ्रिका दौऱयावर रवाना होण्यापूर्वी मायदेशात आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर शरसंधान केले होते. आश्चर्य म्हणजे, त्यानंतर एकाही पत्रकार परिषदेला विराट दिसून आलेला नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट त्याच्या 100 व्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेसाठी येऊ शकेल, असे येथे सांगितले.
जलद गोलंदाज बुमराहला उपकर्णधारपदी बढती
भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराहला सोमवारी कसोटी उपकर्णधारपदी बढती देण्यात आली. बुमराहची मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात संघाच्या उपकर्णधारपदी यापूर्वीच नियुक्ती जाहीर केली गेली आहे. बुमराहला उपकर्णधारपदी बढती हा एकप्रकारे रिषभ पंतला अप्रत्यक्ष इशारा मानला जातो.