ऑनलाईन टीम / लेह :
भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने लडाखच्या सीमारेषेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू केल्याने भारतानेही सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवानांची कुमक वाढवली आहे.
भारताने शुक्रवारी लेहमध्ये लष्कर आणि वायुदलाचा संयुक्त सराव घेत चीनला आपली संयुक्त ताकद दाखवून दिली आहे. या युद्धसरावामध्ये लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी झाली होती.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावर झालेल्या दोन्ही देशांच्या बैठकीत सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले होते. मात्र, चीनने लडाख सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमवले असून, त्यांची लढाऊ विमाने लडाख भागात घिरट्या घालत होती. चीनने होतान, ग्यारी व शिगत्से या भागात लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणले आहेत.
त्यामळे धोकादायक चीनवर विश्वास न ठेवता भारताने पूर्ण युद्धसज्जता ठेवली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गलवान खोऱ्यात तसेच हॉटस्प्रिंग, कोयुल, फुकचे, मुरगे, डेपसाँग भागात चिनी सैन्याकडून पुन्हा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतानेही सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य वाढवले आहे.