वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा विदेशी चलन साठा उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठा 8.895 अब्ज डॉलर्सने वाढून 642.453 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच्या आरबीआयच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
विदेशी चलन भांडार 27 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवडय़ात 16,.663 अब्ज डॉलर्सने वाढून 633.558 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. तर तत्पूर्वी 20 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवडय़ात 616.895 अब्ज डॉलर्स राहिला होता.
संबंधित आठवडय़ात देशाचा एफसीए 8.213 अब्ज डॉलर्सने वाढून 579.813 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. डॉलर्समध्ये मांडल्या जाणाऱया एफसीएमध्ये विदेशी चलन साठय़ात सामील युरो, पौंड आणि येन यासारख्या अन्य विदेशी चलनांच्या मूल्यातील वृद्धी किंवा घट यांचा प्रभाव देखील सामील असतो.
आकडेवारीनुसार संबंधित आठवडय़ात सोन्याचा साठा 64.2 कोटी डॉलर्सने वाढून 38.083 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत देशाचा एसडीआर म्हणजेच स्पेशल ड्रॉइंग राइट 2.9 कोटी डॉलरने वाढून 19.437 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. तर आयएमएफमध्ये देशाचा राखीव विदेशी चलन साठा 1.1 कोटी डॉलर्सने वाढून 5.121 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.