बेल्जियमची 5-2 गोलफरकाने मात, हेन्ड्रिक्सची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/ टोकियो
41 वर्षांनंतर ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचे भारताच्या पुरुष हॉकी संघाचे स्वप्न भंगले असून येथे झालेल्या उपांत्य लढतीत त्यांना वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमकडून 2-5 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. आता कांस्यपदकासाठी त्यांची लढत गुरुवारी जर्मनीविरुद्ध होणार आहे. दुसऱया उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
बेल्जियमतर्फे हॅट्ट्रिक नेंदवणाऱया अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने 19, 49, 53 व्या मिनिटाला गोल नोंदवले. तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू असून त्याने आतापर्यंत 14 गोल केले आहेत. याशिवाय लोइक लुयपेर्ट (दुसरे मिनिट), जॉन जॉन डोहमन (60) यांनीही एकेक गोल नोंदवले. बेल्जियमने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविले होते आणि यावेळचा त्यांचा फॉर्म पाहता तेच विजेतेपदाचे दावेदार असल्याचे मानले जात आहे. जेतेपदासाठी त्यांची लढत बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतातर्फे हरमनप्रीत सिंग (7 वे मिनिट), मनदीप सिंग (8 वे मिनिट) यांनी नोंदवले. भारताने यापूर्वी 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि त्यावेळी सुवर्णपदकही पटकावले होते. हॉकीमधील तेच भारताचे शेवटचे सुवर्णपदक होते.
भारताच्या बचावफळीची निष्प्रभ कामगिरी हेच भारताच्या पराभवाचे कारण आहे. बेल्जियमने भारताच्या बचावफळीला सतत दडपणाखाली ठेवत तब्बल 14 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, त्यापैकी चारवर त्यांनी गोल नोंदवले. भारतीय सर्कलमध्ये प्रवेश करायचा आणि पेनल्टी कॉर्नर्स मिळवायचे हाच बेल्जियमचा प्रारंभापासूनचा गेमप्लॅन होता, हे दिसून आले. हेन्ड्रिक्स व लोईक यांनी ही योजना परिपूर्णतेने अमलात आणली. बचावफळीही दडपणाखाली कोलमडल्याने अनेक पेनल्टी कॉर्नर्स भारताने त्यांना बहाल केले. भारतानेही पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळवले. पण त्यापैकी एकावरच त्यांना गोल नोंदवता आला. आता त्यांना दीर्घकाळापासून हुलकावणी दिलेल्या पदकासाठी प्रयत्न करावे लागणार असून कांस्यपदकासाठी जर्मनीविरुद्ध त्यांना लढावे लागणार आहे.
भारताने संथ सुरुवात केली. पण बेल्जियमने पहिल्या पाच मिनिटात आक्रमणाचा धडाका सुरू करीत नियंत्रण ठेवले आणि त्यात एक गोलही नोंदवला. पहिल्या आक्रमणातच त्यांनी पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि त्यावर लोईकने जबरदस्त फ्लिक करीत गोल नोंदवला. भारतानेही नंतर जोरदार आक्रमण करीत सातव्या व आठव्या मिनिटाला दोन गोल नोंदवून बेल्जियमवर 2-1 अशी आघाडी घेतली. सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने पहिला गोल नोंदवला. त्याचा हा स्पर्धेतील पाचवा गोल होता. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने अप्रतिम मैदानी गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. उजवीकडून अमित रोहिदासकडून मिळालेल्या पासवर रिव्हर्स फटका मारत त्याने हा गोल केला. पहिल्या सत्रात भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण रुपिंदर पाल सिंगचा फटका बेल्जियन गोलरक्षक व्हिन्सेंट व्हानाशने अचूक थोपवला.
दुसऱया सत्रात बेल्जियमने जोरदार हल्ले करीत भारतीय बचावफळीवर दबाव आणला आणि चार पेनल्टी कॉर्नर्स मिळवित त्यात त्यांना यशही आले. यातील चौथ्या पेनल्टी कॉर्नरवर हेन्ड्रिक्सने गोल नोंदवत संघाला बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला श्रीजेशने अप्रतिम बचाव करीत डॉकियरचा प्रयत्न वाया घालविला. बेल्जियमने लवकरच सहावा पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण त्यावर भारताने उत्तम बचाव केला. मध्यंतरास एक मिनिट असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावेळी हरमनप्रीतने वाईड फटका मारल्याने तो वाया गेला.
तिसऱया सत्रात बेल्जियमने भारतीय हद्दितच खेळ करीत वर्चस्व राखले. पण भारतानेही उत्तम बचाव करीत त्यांचे अनेक प्रयत्न फोल ठरविले. 38 व्या मिनिटाला भारताला आघाडी घेण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण या पेनल्टी कॉर्नरवर बेल्जियमने बचाव केल्याने ती वाया गेली. चौथ्या सत्रात मात्र बेल्जियमने आक्रमणाचा धडाका सुरू करीत 49 व्या मिनिटाला सलग तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. हेन्ड्रिक्सने त्यापैकी एकावर गोल नोंदवून आघाडी घेतली. नंतरही त्यांनी आणखी तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्याचे नंतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये रूपांतर झाले. त्यावर हेन्ड्रिक्सनेच गोल नोंदवत हॅट्ट्रिक पूर्ण केली. दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने जादा खेळाडूसाठी गोलरक्षक श्रीजेशला बाजूला केले. पण ही चाल फसली आणि डोहमनने प्रतिआक्रमणात रिकाम्या गोलपोस्टमध्ये आरामात फटका मारून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.