वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
हॉकी प्रो-लिग स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बलाढय़ हॉलंडला 5-2 ने हरवले. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने 2 तर गुरजंत सिंग, ललित उपाध्याय व मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आज, उभय संघातील दुसरा व शेवटचा सामना येथील कलिंगा स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
सामन्यातील पहिल्याच मिनीटाला गुरजंत सिंहने मैदानी गोल करत भारताला 1-0 आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या या आक्रमणामुळे हॉलंडचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. यानंतर ड्रगफ्लिकर रुपिंदरपालनेही 12 व्या मिनीटाला चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी 2-0 ने वाढवली. काही क्षणात हॉलंडच्या जीप जॉन्सनने 14 व्या मिनीटाला एक गोल नोंदवत संघाची आघाडी 2-1 अशी कामी केली. दुसऱया सत्रात हॉलंडच्या खेळाडूंनी चांगला खेळ साकारला. 28 व्या मिनीटाला जेरॉन हर्ट्झब्रेगरने गोल नोंदवत हॉलंडला 2-2 अशी आघाडी मिळवून दिली. यामुळे मध्यंतरापर्यंत उभय संघात 2-2 अशी बरोबरी होती.
मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळावर भर दिला. 34 व्या मिनीटाला मनदीप सिंह आणि 36 व्या मिनीटाला ललित उपाध्यायने हॉलंडची बचावफळी भेदत सुरेख मैदानी गोल झळकावले व संघाला 4-2 असे आघाडीवर नेले. यानंतर पाहुणा संघ या सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. 46 व्या मिनीटाला रुपरिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल झळकावत भारताची आघाडी 5-2 ने वाढवली. अखेरपर्यंत हॉलंड संघाने गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. शेवटी, भारतीय हॉकी संघाने हा सामना 5-2 असा जिंकला.