19 वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा : उपांत्य सामन्यात पाकिस्तानी संघाचा 10 गडी राखून धुव्वा
पोश्चेफस्ट्रुम / वृत्तसंस्था
विद्यमान विजेत्या भारतीय युवा संघाने मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानी युवा संघाचा तब्बल 10 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला आणि 19 वर्षाखालील आयसीसी युवा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱया पाकिस्तानचा डाव 43.1 षटकात सर्वबाद 172 धावांमध्येच गुंडाळल्यानंतर भारताने 35.2 षटकात बिनबाद 176 धावांसह दणकेबाज विजय संपादन केला.
आजवर चारवेळा या स्पर्धेचे विश्वजेतेपद मिळवणाऱया भारतीय युवा संघाने तोच रुबाब, तोच लौकिक येथे पहिल्या उपांत्य लढतीत देखील गाजवला. वास्तविक, भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या उपांत्य फेरीपर्यंत अपराजित होते. त्यामुळे, दोन्ही संघात क्रिकेटच्या मैदानावर तुंबळ युद्ध अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात पाकिस्तानला सर्व आघाडय़ांवर चारीमुंडय़ा चीत करत भारताने दणकेबाज विजय प्राप्त केला.
विजयासाठी 172 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना यशस्वी जैस्वाल (नाबाद 105) व दिव्यांश सक्सेना (नाबाद 59) या जोडीनेच सावध व आक्रमक फलंदाजीचा उत्तम मिलाफ साधत विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठले. पाकिस्तानी संघाला किंचीतही डोके वर काढण्याची अजिबात संधी लाभणार नाही, याचीही या उभयतांनी काटेकोर तजवीज केली.
या मालिकेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत जैस्वाल 306 धावांसह अव्वलस्थानी विराजमान असून येथील महत्त्वपूर्ण उपांत्य लढतीत त्याने 112 चेंडूंतील खेळी 8 चौकार व 4 उत्तुंग षटकारांनी सजवली. सक्सेनाने देखील 6 चौकार वसूल करत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.
तत्पूर्वी, सुशांत मिश्रा (3-28), कार्तिक त्यागी (2-32) व रवी बिश्नोई (2-46) यांनी एकत्रित 7 बळी घेतले तर अथर्व अंकोलेकर (1-29), यशस्वी जैस्वाल (1-11) यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद करत पाकिस्तानला आणखी गोत्यात आणले. पाकिस्तानतर्फे कर्णधार रोहेल नझीर (62) व सलामीवीर हैदर अली (56) या जोडीने शानदार अर्धशतके झळकावली. पण, त्यांना अन्य सहकारी फलंदाजांची यथोचित साथ अजिबात लाभली नाही. अलीच्या 77 चेंडूतील 56 धावांच्या खेळीत 9 चौकार तर नझीरच्या 102 चेंडूतील 62 धावांच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश राहिला.
धावफलक
पाकिस्तान युवा संघ : हैदर अली झे. रवी बिश्नोई, गो. जैस्वाल 56 (77 चेंडूत 9 चौकार), मोहम्मद हुराईरा झे. सक्सेना, गो. मिश्रा 4 (6 चेंडूत 1 चौकार), फहाद मुनीर झे. अंकोलेकर, गो. रवी बिश्नोई 0 (16 चेंडू), रोहेल नझीर झे. तिलक वर्मा, गो. मिश्रा 62 (102 चेंडूत 6 चौकार), कासिम अक्रम धावचीत (अंकोलेकर-जुरेल) 9 (16 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद हॅरिस झे. सक्सेना, गो. अंकोलेकर 21 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), इरफान खान त्रि. गो. कार्तिक त्यागी 3 (9 चेंडू), अब्बास आफ्रिदी पायचीत गो. रवी बिश्नोई 2 (3 चेंडू), ताहीर हुसेन झे. जुरेल, गो. कार्तिक त्यागी 2 (10 चेंडू), आमीर अली झे. वीर, गो. मिश्रा 1 (6 चेंडू), मोहम्मद आमीर खान नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 12. एकूण 43.1 षटकात सर्वबाद 172.
गडी बाद होण्याचा क्रम
1-9 (मोहम्मद हुराईरा, 1.6), 2-34 (फहाद, 8.5), 3-96 (हैदर अली, 25.3), 4-118 (कासिम, 30.3), 5-146 (हॅरिस, 34.4), 6-156 (इरफान, 37.2), 7-163 (अब्बास, 38.1), 8-169 (रोहेल, 41.4), 9-172 (ताहीर, 42.6), 10-172 (आमीर, 43.1).
गोलंदाजी
कार्तिक त्यागी 8-0-32-2, सुशांत मिश्रा 8.1-0-28-3, रवी बिश्नोई, 10-0-46-2, आकाश सिंग 7-0-25-0, अथर्व अंकोलेकर 7-0-29-1, यशस्वी जैस्वाल 3-0-11-1.
भारतीय युवा संघ : यशस्वी जैस्वाल नाबाद 105 (113 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), दिव्यांश सक्सेना नाबाद 59 (99 चेंडूत 6 चौकार). अवांतर 12. एकूण 35.2 षटकात बिनबाद 176.
गोलंदाजी
ताहीर हुसेन 6-1-17-0, कासिम अक्रम 8-0-37-0, मोहम्मद आमीर खान 5-1-20-0, अब्बास आफ्रिदी 7-0-50-0, आमीर अली 5.2-0-38-0, फहाद मुनीर 4-0-12-0.
जेव्हा पाकिस्तानचे दोघेही फलंदाज एकाच एण्डकडे धावले!
पाकिस्तानच्या डावात रनिंग बिटविन द विकेटमधील घोटाळा चांगलाच चव्हाटय़ावर आला. डावातील 31 व्या षटकात रोहेल नझीर व कासिम अक्रम क्रीझवर असताना ही घटना घडली. रवी बिश्नोईच्या त्या षटकातील तिसरा चेंडू कासिमने कव्हरकडे फटकावला आणि एकेरी धावेसाठी कॉल दिला. पण, नंतर धाव पूर्ण करावी की करु नये, या गोंधळात दोन्ही फलंदाज नॉन स्ट्रायकर एण्डच्या दिशेने एकाच वेळी पोहोचले व तिकडे क्षेत्ररक्षक अथर्व अंकोलेकरने यष्टीरक्षक जुरेलकडे चेंडू सोपवल्यानंतर त्याने आपली जबाबदारी अतिशय चोखरित्या पार पाडली.
बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यात उद्या दुसरी उपांत्य लढत
या स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत उद्या (गुरुवार) बांगलादेश व न्यूझीलंड यांच्या युवा संघात होईल व यातील विजेत्या संघाशी भारताची फायनल होणार आहे. या स्पर्धेतील जेतेपदासाठी निर्णायक अंतिम लढत 9 फेब्रुवारी रोजी होईल. त्यापूर्वी, सातव्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया-विंडीज यांच्यात 7 फेब्रुवारी तर तिसऱया स्थानासाठी पाकिस्तानची लढत 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बांगलादेश-न्यूझीलंड लढतीतील पराभूत संघ पाकिस्तानविरुद्ध तिसऱया स्थानासाठी लढेल.