पाहुण्या विंडीज संघाविरुद्ध 6 गडी राखून सहज विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर
कोलकाता / वृत्तसंस्था
पदार्पणवीर रवी बिश्नोई, हर्षल पटेलचे प्रत्येकी 2 बळी व रोहित-इशान-सुर्यकुमारच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने विंडीजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी राखून सहज विजय संपादन केला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱया विंडीजला 20 षटकात 7 बाद 157 धावांवर रोखल्यानंतर भारताने 18.5 षटकात 4 बाद 162 धावांसह दमदार विजय संपादन केला.
विजयासाठी 158 धावांचे आव्हान असताना कर्णधार रोहित शर्मा (19 चेंडूत 40) व इशान किशन (42 चेंडूत 35) यांनी 7.3 षटकात 64 धावांची सलामी दिली. मधल्या फळीत विराट (17) व रिषभ पंत (8) स्वस्तात तंबूत परतले असले तरी सुर्यकुमार यादव (18 चेंडूत नाबाद 34) व वेंकटेश अय्यर (13 चेंडूत नाबाद 24) यांनी पाचव्या गडय़ासाठी 48 धावांची भागीदारी साकारत विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनने 61 धावांची झंझावाती खेळी साकारल्यानंतर विंडीजने निर्धारित 20 षटकात 7 बाद 157 धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या मध्यात थोडीफार पडझड झाली असली तरी पूरनच्या फटकेबाजीमुळे विंडीजला दीडशतकी टप्पा पार करता आला. अलीकडेच आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 10.75 कोटी रुपये इतकी भरभक्कम रक्कम मोजत करारबद्ध केलेल्या डावखुऱया निकोलस पूरनने आपल्या नेहमीच्या शैलीत भारतीय गोलंदाजांवर तुटून पडण्यावर भर दिला. त्याच्या 43 चेंडूतील धमाकेदार खेळीत 4 चौकार व 5 षटकारांचा समावेश राहिला.
विंडीजतर्फे तिसऱया स्थानी उतरणाऱया या दिग्गज फलंदाजाला मागील आयपीएलमध्ये 7.72 च्या सरासरीने जेमतेम 85 धावा जमवता आल्या. त्यानंतर विंडीजविरुद्ध 3 वनडेत तो अनुक्रमे 18, 9 व 34 अशा किरकोळ धावांवर बाद झाला. येथे मात्र त्याने पहिल्या टी-20 लढतीत भुवनेश्वरला उत्तुंग षटकार खेचत आपले बुलंद इरादे स्पष्ट केले होते.
यजुवेंद्र चहल व पदार्पणवीर लेगस्पिनर रवी बिश्नोई या जोडीने मधल्या षटकात 3 बळी घेत विंडीजला सातत्याने धक्के दिले. पण, नंतर पूरनच्या फटकेबाजीमुळे पाहुण्या संघाला शेवटच्या 5 षटकात 61 धावांची आतषबाजी करण्यात यश आले. नव्याने तंदुरुस्त केरॉन पोलार्डने 19 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी साकारली. त्याने 2 चौकार व एक षटकार वसूल केला. यापूर्वी वनडे मालिकेतील शेवटच्या 2 लढतीत पोलार्डला खेळता आले नव्हते.
जोधपूरचा गुगलीमॅन बिश्नोईने 4 षटकात 17 धावात 2 बळी असे पृथक्करण नोंदवत आपले पदार्पण अगदी थाटात साजरे केले. त्याने रोस्टन चेस (4) व रोव्हमन पॉवेल (2) यांना केवळ चार चेंडूंच्या अंतरात बाद केले. भुवनेश्वरने स्विंग गोलंदाजीवर ब्रेन्डॉन किंगला पहिल्याच षटकात बाद केले. आऊटस्विंगर ओळखण्यात चूक करणाऱया किंगचा सुर्यकुमारने सोपा झेल टिपला. काईल मेयर्स व पूरन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नंतर पूरनने भुवनेश्वरला षटकार फटकावत दडपण झुगारुन टाकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
मेयर्सने देखील चहल व हर्षल पटेल यांच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवत विंडीजला पॉवर प्लेच्या 6 षटकात 1 बाद 44 पर्यंत मजल मारुन दिली. रोहितने यावेळी सर्वात अनुभवी फिरकीपटू चहलला आक्रमणावर आणले आणि त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना पहिल्याच चेंडूवर पूरनला बाद केलेच होते. पण, पदार्पणवीर बिश्नोईकडून चूक झाली आणि पूरनला महत्त्वपूर्ण जीवदान मिळाले. चहलने नंतर सेट झालेल्या मेयर्सला बाद केले तर उत्तरार्धात पूरन व पोलार्ड यांनी फटकेबाजी केली.
धावफलक
विंडीज ः ब्रेन्डॉन किंग झे. यादव, गो. कुमार 4 (5 चेंडूत 1 चौकार), काईल मेयर्स पायचीत गो. चहल 31 (24 चेंडूत 7 चौकार), निकोलस पूरन झे. कोहली, गो. पटेल 61 (43 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), रोस्टन चेस पायचीत गो. बिश्नोई 4 (10 चेंडू), रोव्हमन पॉवेल झे. अय्यर, गो. बिश्नोई 2 (3 चेंडू), अकिल हुसेन झे. व गो. चहर 10 (12 चेंडूत 1 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 24 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ओडियन स्मिथ झे. रोहित, गो. पटेल 4 (4 चेंडू). अवांतर 17. एकूण 20 षटकात 7 बाद 157.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-4 (ब्रेन्डॉन, 0.5), 2-51 (मेयर्स, 6.5), 3-72 (चेस, 10.2), 4-74 (रोव्हमन, 10.5), 5-90 (अकिल, 13.5), 6-135 (निकोलस, 17.6), 7-157 (स्मिथ, 19.6).
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार 4-0-31-1, दीपक चहर 3-0-28-1, हर्षल पटेल 4-0-37-2, यजुवेंद्र चहल 4-0-34-1, रवी बिश्नोई 4-0-17-2, वेंकटेश अय्यर 1-0-4-0.
भारत ः रोहित शर्मा झे. स्मिथ, गो. चेस 40 (19 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), इशान किशन झे. ऍलन, गो. चेस 35 (42 चेंडूत 4 चौकार), विराट कोहली झे. पोलार्ड, गो. ऍलन 17 (13 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत झे. स्मिथ, गो. कॉट्रेल 8 (8 चेंडू), सुर्यकुमार यादव नाबाद 34 (18 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), वेंकटेश अय्यर नाबाद 24 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 4. एकूण 18.5 षटकात 4 बाद 162.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-64 (रोहित, 7.3), 2-93 (इशान, 11.6), 3-95 (विराट, 12.3), 4-114 (पंत, 14.3).
गोलंदाजी ः शेल्डॉन कॉट्रेल 4-0-35-1, शेफर्ड 3-0-24-0, ओडियन स्मिथ 2-0-31-0, अकिल होसेन 4-0-34-0, रोस्टन चेस 4-0-14-2, फॅबियन ऍलन 1.5-0-23-1.
झेल घेतला आणि 3 पावले मागे चालत सीमारेषेपार गेला!
डावातील सातव्या षटकात पदार्पणवीर रवी बिश्नोईने झेल घेतल्यानंतरही 3 पावले मागे जात सीमारेषेला स्पर्शणे आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. एरवी बहुतांशी भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणात अव्वल मानले जातात. मात्र, चहलच्या 7 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर निकोलस पूरनचा उत्तुंग षटकार खेचण्याचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर वेगळेच चित्र पाहण्यात आले. पूरनचा प्रयत्न फसल्यानंतर लाँगऑनवर बिश्नोईसाठी हा सोपा झेल होता. मात्र, आश्चर्य म्हणजे बिश्नोई झेल पूर्ण केल्यानंतर चक्क तीन पावले मागे गेला आणि त्याचा पाय सीमारेषेला लागला. रिप्ले पाहून हा षटकार बहाल केला गेल्यानंतर एकीकडे पूरनला जीवदान लाभले. शिवाय, षटकारही खात्यात जमा झाला. पूरनने या लढतीत 43 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह 61 धावांची आतषबाजी केली. बिश्नोईकडून जीवदान लाभले, त्यावेळी पूरन अवघ्या 8 धावांवर खेळत होता.
तिसऱया टी-20 साठी 20 हजार चाहत्यांना प्रवेश
विंडीजविरुद्ध या मालिकेतील तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीसाठी 20 हजार चाहत्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याबद्दल कॅबचे प्रमुख अविशेक दालमिया यांना ईमेलद्वारे माहिती दिली. बंगाल संघटनेच्या सदस्य व संलग्न संघटनांना 20 हजार पास वितरित केले जाणार असल्याचे दालमिया यावेळी म्हणाले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 लढतीसाठी प्रेक्षकक्षमतेच्या 70 टक्के प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या दोन लढतीसाठी कॉर्पोरेट बॉक्स व डॉ. बीसी रॉय क्लब हाऊसच्या अपर टायरमध्ये 2 हजार चाहत्यांना परवानगी दिली गेली आहे.