ऑलिम्पिक हॉकी- हरमनप्रीतचे दोन गोल, न्यूझीलंडची कडवी झुंज, ऑस्ट्रेलियाही विजयी
वृत्तसंस्था/ टोकियो
हरमनप्रीत सिंगने नोंदवलेले दोन गोल आणि अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने केलेले अप्रतिम गोलरक्षण यांच्या बळावर भारताने ऑलिम्पिक हॉकीमध्ये विजयी सुरुवात करताना न्यूझीलंडवर 3-2 अशा गोलफरकाने मात केली.
हरमनप्रीतने 26 व 33 व्या मिनिटाला तर रुपिंदर पाल सिंगने दहाव्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले. भारताला जागतिक क्रमवारीत चौथे मानांकन असून न्यूझीलंड आठव्या स्थानावर आहे. गट अ मधील या सामन्यात केन रसेलने सहाव्या मिनिटाला पेनल्टीवर आणि 43 व्या मिनिटाला स्टीफन जेनेसने न्यूझीलंडचे गोल नोंदवले. भारताचा दुसरा सामना बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात यजमान जपानवर 5-3 अशा फरकाने विजय मिळविला.
ऑलिम्पिक मोहिमेचा विजयी श्रीगणेशा केल्यामुळे भारताचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी समाधान व्यक्त केले, मात्र काही विभागात सुधारणेस अजून वाव असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ऑलिम्पिकसारख्या सर्वात मोठय़ा स्पर्धेत पहिलाच सामना जिंकून तीन गुण मिळविणे महत्त्वाचेच आहे. आपल्या संघाने दुसऱया व तिसऱया सत्रात चांगले प्रदर्शन केले. पण पहिल्या आणि चौथ्या सत्रात थोडेसे झगडावे लागले. व्हिडिओ चित्रण पाहून चुकांची दुरुस्ती करण्यावर आम्ही भर देणार आहोत,’ असेही ते म्हणाले.
या सामन्यात सहाव्याच मिनिटाला रसेलने पेनल्टीवर गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली. मनदीप सिंगने गोल नोंदवला नसला तरी आघाडीवर त्याने चमकदार प्रदर्शन केले आणि दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला, नंतर त्याचे पेनल्टी स्ट्रोकमध्ये रूपांतर झाले आणि त्यावर रुपिंदर पाल सिंगने अचूक गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. न्यूझीलंडने नंतर आक्रमक खेळ करीत भारतावर बरेच दडपण आणत सलग चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यापैकी एकाचाही त्यांना लाभ घेता आला नाही. प्रतिआक्रमण करीत गुर्जंत सिंगने गोलपर्यंत धडक मारली होती. पण गोलरक्षक लियॉन हेवर्डने अप्रतिम बचाव करीत त्याचा हा प्रयत्न फोल ठरवला.
दुसऱया सत्रातील चौथ्या मिनिटालाही मनदीप सिंगचा प्रयत्न हेवर्डने फोल ठरवला. मात्र सहा मिनिटानंतर हरमनप्रीतने गोल नोंदवून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात तिसऱयाच मिनिटाला हरमनप्रीतने त्यात आणखी एका गोलाची भर दुसऱया पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पुढच्याच मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नवर न्यूझीलंड गोलरक्षकाने त्याचा फटका थोपवत अचूक बचाव केला. 43 व्या मिनिटाला जेनेसने गोल नोंदवून भारताची आघाडी कमी केली. शेवटच्या काही मिनिटात न्यूझीलंडने अनेकदा चढाया केल्या आणि बरोबरीसाठी प्रयत्न करताना तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण ते वाया गेले. सामना संपण्यास 24 सेकंद असताना न्यूझीलंडने पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण श्रीजेशने अप्रतिम बचाव करीत भारताचा विजय निश्चित केला.