ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुवेतमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय लष्कराच्या 15 जणांची मेडिकल टीम इंडियन एअर फोर्सच्या विशेष विमानाने कुवेतला पाठविण्यात आली. एअर फोर्सचे सी -130 हरक्युलिस हे मालवाहतूक विमान कुवेतमध्ये पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली.
कुवेतमध्ये कोरोनाने हातपाय पसरल्यानंतर तेथील परिस्थिती कशी हाताळावी यासाठी कुवेतचे पंतप्रधान शेख सबा अल खालिद अल हमाद अल सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून मदतीची विनंती केली. त्यानंतर भारतीय लष्कराच्या 15 जणांची मेडिकल टीम शनिवारी कुवेतला पाठविण्यात आली.
कोरोनाच्या लढाईत सध्या प्रत्येक देश स्वतःपुरता विचार करत आहे. भारताने मात्र, आखाती देशांचा विचार केला आहे. भारताने पाठवलेली मेडिकल टीम दोन आठवडे तिथे राहील. कोरोना चाचणी आणि उपचारांमध्ये ही टीम तेथील आरोग्य विभागाला मदत करणार आहे. तसेच तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. गरज पडल्यास आणखी टीम पाठविण्यास तयार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.