वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या आशियाई युवा व कनिष्ठांच्या बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेश (48 किलो गट) व वंशज 63.5 किलो) यांनी युवा विभागात सुवर्णपदके पटकावली. भारताने या स्पर्धेत एकूण 39 पदके पटकावली असून त्यात 15 सुवर्ण, 10 रौप्य व 14 कांस्यपदकांचा समावेश आहे.
युवा विभागात भारताने 7 सुवर्ण, 3 रौप्य व 8 कांस्यसह एकूण 18 पदके मिळविली तर कनिष्ठ विभागात 8 सुवर्ण, 7 रौप्य व 6 कांस्यसह एकूण 21 पदके मिळविली. चेन्नईच्या विश्वनाथ सुरेशने शानदार प्रदर्शन करीत किर्गीझस्तानच्या एर्गेशोव्ह बेकझतवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. नंतर वंशजने उझ्बेकच्या जावोखिर उम्मातालिएक्हवर 4-1 असा विजय मिळवित सुवर्ण पटकावले. मात्र 92 किलोवरील गटात भारताच्या अमन सिंग बिश्तला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला जॉर्डनच्या सैफ अल रवाशदेहने 4-1 असे हरविले. याशिवाय रमन (51 किलो), आनंद यादव (54 किलो), दीपक (75 किलो) यांना कांस्यपदके मिळाली. महिलांमध्ये निवेदिता कर्की (48 किलो), तमन्ना (50 किलो), शाहीन गिल (60 किलो), रविना (63 किलो), मुस्कान (75 किलो) यांनी सुवर्णपदके मिळविली. युवा विभागातील पदकतक्त्यात भारताने एकूण 18 पदकांसह तिसरे स्थान मिळविले. उझ्बेकिस्तान व कझाकस्तान यांनी 23 व 22 पदके मिळवित पहिले व दुसरे स्थान मिळविले.
कनिष्ठ विभागात विनी (50 किलो), यक्षिका (52), निकिता चंद (60), विधी (57), सृष्टी साठे (63), रुद्रिका (75) यांनी मुलींमध्ये सुवर्णपदके मिळविली तर मुलांमध्ये क्रिश पाल, यशवर्धन सिंग यांनी सुवर्ण पटकावले. पदकतक्त्यात भारतीय ज्युनियर संघाने उझ्बेकिस्ताननंतर दुसरे स्थान मिळविले.
भारताने मागील वेळीही दुबईत झालेल्या स्पर्धेत एकूण 39 पदकेच मिळविली होती. मात्र यावेळी एक सुवर्णपदक जास्त मिळविले आहे. मागील वेळी 14 सुवर्णपदके मिळविली होती. या स्पर्धेत एकूण 21 देशांतील 352 बॉक्सर्सनी भाग घेतला होता.