लसपुरवठय़ात महत्त्वाची भूमिका
जिनिव्हा
कोरोना महामारीने जगभरात लाखो लोकांचा जीव घेतला आहे. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नानंतर या विषाणूच्या विरोधात कोविड-19 लस तयार झाली आहे. भारतात तयार होत असलेले कोविशिल्ड ही लस अनेक देशांना पुरविली जात आहे. भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचे आता जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोरोनाविरोधी लढय़ातील योगदानासाठी धन्यवाद. संकटाच्या या समयी आम्ही मिळून पावले टाकल्यास या जीवघेण्या विषाणूला रोखू शकतो असे उद्गार डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदानोम गेब्रेयेसस यांनी काढले आहेत.
ब्राझीलला 20 लाख डोस पुरविले
भारताने कोरोनावरील लसीचे 20 लाख डोस ब्राझीलला पाठविले आहेत. लस मिळताच ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी आनंद व्यक्त करत याची तुलना भगवान हनुमानांनी आणलेल्या संजीवनीसोबत केली आहे. बोल्सोनारो यांनी भगवान हनुमानाचे चित्र ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
भूतान, नेपाळ, बांगलादेशला मदत
भारताने शेजारी देश भूतानलाही कोविड लस पुरविली आहे. भारताने कोविशिल्ड लसीचे सुमारे 1.5 लाख डोस भूतानमध्ये पाठविले आहेत. याचबरोबर नेपाळ आणि बांगलादेशलाही लस पुरविली आहे. भारताच्या या मदतीसाठी नेपाळच्या पंतप्रधानांनीही जाहीरपणे आभार मानले आहेत. म्यानमार, मॉरिशस, सेशेल्स तसेच मोरक्कोलाही भारताकडून लस पुरविण्यात येत आहे.