वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2022 साली कतार येथे होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई पात्र फेरीच्या दुसऱया फेरीतील उर्वरित सामने कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाल्याने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर सामने जून महिन्यात खेळविण्यात येणार आहेत.
विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आशिया विभागातून पात्र फेरीसाठी घेण्यात येणाऱया स्पर्धेमध्ये किमान 12 देशांचे सामने बाकी आहेत. 12 देशांचे संघ आठ गटात विभागले जाणार आहेत. पात्र फेरीचे हे सामने मार्च महिन्यात घेण्याचे निश्चित केले होते. पण कोरोनाचा नव्याने प्रसार सुरू झाल्याने पात्रतेचे हे सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आशियाई विभागातून यजमान कतारसह अन्य चार संघ विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी निश्चित पात्र ठरणार आहेत.