भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयासाठी सज्ज, श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला संधी शक्य, कुलदीपबाबत औत्सुक्य
वृत्तसंस्था / पुणे
360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या गुणवान सूर्यकुमार यादवला आज इंग्लंडविरुद्ध होणाऱया दुसऱया वनडे सामन्यात स्थान मिळण्याची दाट शक्यता असून येथेच भारतीय संघ मालिकाविजय संपादन करण्याचे बुलंद इरादे उराशी बाळगून मैदानात उतरेल. दुपारी 1.30 वाजता या लढतीला प्रारंभ होणार आहे.
यापूर्वी, पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरचा खांदा निखळला आणि शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असल्याने तो किमान 4 महिने खेळू शकणार नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादववर फोकस असेल, हे निश्चित झाले आहे. सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच टी-20 मालिकेत ब्लॉकबस्टर पदार्पण केले. आता वनडेतही त्याच्याकडून अशाच धमाकेदार खेळाची भारताला अपेक्षा आहे.
सध्या संघातील एकाच जागेसाठी अनेक तगडे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे, अंतिम संघात कोणाला निवडायचे, हा सुखद पेच कर्णधार विराट, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमोर आणखी एकदा असेल. कोहलीकडे मागील तीन महिन्यांपासून रवींद्र जडेजाचा पर्याय उपलब्ध नाही. शिवाय, कसोटीत अक्षर पटेलही त्याच्यासाठी उपलब्ध नाही. पण, कृणाल पंडय़ा जवळपास मुख्य प्रवाहात आला आहे आणि आयपीएलमुळे प्रकाशझोतात आलेला प्रसिद्ध कृष्णा हा जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांच्या गैरहजेरीतही ज्या तडफेने गोलंदाजी करु शकला, त्याने संघाच्या आशाअपेक्षा अर्थातच आणखी उंचावल्या आहेत. आता जडेजा व बुमराह ज्यावेळी संघात परततील, त्यावेळी कृणाल किंवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाला राखीव खेळाडूत बसावे लागेल, हे निश्चित आहे.
धवनच्या फॉर्ममुळे दिलासा
भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनला सूर सापडल्याने भारतीय संघाला मोठा दिलासा लाभला आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत धवनला शतकाने अवघ्या दोन धावांनी हुलकावणी दिली असली तरी त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याचा फॉर्म अधोरेखित झाला आहे. या लढतीत अशीच आणखी एका आक्रमक खेळीची त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने मागील लढतीत 9 षटकात तब्बल 68 धावा लुटू दिल्या होत्या. त्याची जागा आता लेगस्पिनर यजुवेंद्र चहल घेऊ शकतो. जलद गोलंदाजीची आघाडी भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा व शार्दुल ठाकुर हे त्रिकुट सांभाळेल. यापूर्वी या त्रिकुटाने पहिल्या लढतीत इंग्लंडचे 10 पैकी 9 फलंदाज गारद केले होते. पहिल्या 15 षटकात जेसॉन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यानंतर हे त्रिकुट ज्या तडफेने बरसत राहिले, ते विशेष लक्षवेधी ठरले.
शार्दुल ठाकुर अलीकडे सातत्याने खेळत राहिला असून त्याला विश्रांती देत टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराजला संधी देऊन वैविध्य आणण्याचा संघव्यवस्थापन विचार करणार का, हे देखील येथे स्पष्ट होईल.
इशान किशन, सूर्यकुमार टी-20 वर्ल्डकपसाठी सक्षम : व्हीव्हीएस लक्ष्मण
नवी दिल्ली : युवा खेळाडू इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी ज्या तडफेने आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले, ते पाहता आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी ते निश्चितच सक्षम आहेत, ही स्पर्धा ते गाजवू शकतील, असा होरा माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने नोंदवला. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतातच खेळवली जाणार आहे.
यापूर्वी, 22 वर्षीय इशान किशनने पदार्पणात 32 चेंडूत 56 धावांची आतषबाजी केली तर सूर्यकुमार यादवने आपल्या सलामीच्या लढतीत 17 चेंडूत 32 धावांचा पाऊस पाडला. या पार्श्वभूमीवर व्हीव्हीएस लक्ष्मण क्रिकेट कनेक्टेड या शोमध्ये बोलत होता.
माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विश्वचषकासाठी अद्याप बराच कालावधी बाकी असून बरेच खेळाडू आयपीएल स्पर्धेत आपला फॉर्म सिद्ध करत संघाचे दरवाजे ठोठावू शकतील, असे नमूद केले. भुवनेश्वर कुमार पूर्ण तंदुरुस्त असेल व बहरात असेल तर त्याला संधी द्यायला हवी, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. भुवनेश्वरने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे लढतीत 30 धावात 2 बळी घेतले. शिवाय, टी-20 मालिकेतील 5 सामन्यात त्याने 4 फलंदाजांना बाद केले. दुखापतीमुळे तो काही काळ बाहेर होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने पुनरागमन केले आहे.
इंग्लंडला मॉर्गन, बिलिंग्जच्या दुखापतींची चिंता
3 सामन्यांच्या या मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडसाठी आजची लढत अस्तित्वाची असेल. त्यातच कर्णधार इयॉन मॉर्गन व सॅम बिलिंग्ज यांच्या दुखापतीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हे दोन्ही खेळाडू आज पूर्ण तंदुरुस्त असणार का, याबद्दल साशंकता आहे. उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार मॉर्गन उर्वरित दोन्ही सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. इंग्लंडचे मध्यफळीतील फलंदाज अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाहीत, ही देखील त्यांची आणखी एक चिंता आहे. यापूर्वी पहिल्या लढतीत बेन स्टोक्स, जोस बटलर व मोईन अली या तिन्ही खेळाडूंनी सपशेल निराशा केली होती. फिरकीपटू आदिल रशिद व मोईन अली भारतीय फलंदाजांना रोखण्यात अजिबात यशस्वी झाले नाहीत. मागील लढतीत या उभयतांचीही पाटी कोरी राहिली.
रोहित शर्मा पूर्ण तंदुरुस्त
रोहित शर्माला यापूर्वी पहिल्या लढतीत चेंडू आदळल्याने आघात सोसावा लागला होता. पण, येथे दुसऱया लढतीसाठी तो पूर्ण तंदुरुस्त असेल, असे संकेत आहेत. एखाद्या प्रसंगी रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय झाला तर शुभमन गिल व शिखर धवन सलामीला उतरतील आणि केएल राहुल नेहमीप्रमाणे मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. अर्थात, रोहित पूर्ण तंदुरुस्त आहे. रिषभ पंत स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळेल तर केएल राहुलकडेच यष्टीरक्षणाची धुरा असेल, हे देखील स्पष्ट असल्याचे संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करण, टॉम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशिद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड. राखीव खेळाडू : जेक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा., थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क