कोरोना संकट : वैद्यकीय सामग्रीद्वारे चीनला मदत करणार, वुहान शहरात अडकून पडलेले भारतीय परतणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाचे विशेष विमान वैद्यकीय सामग्रीसह वुहानकरता बुधवारी रवाना झाले आहे. 27 फेब्रुवारी रोजी हे विमान भारतात परतणार आहे. या विमानातून अनेक भारतीय तसेच काही शेजारी देशांचे नागरिक परतण्याची शक्यता आहे. या विमानातून 15 टन वजनाची वैद्यकीय उपकरणे चीनला पाठविण्यात आली आहेत. यात मास्क, ग्लोव्ह्ज आणि अन्य आपत्कालीन वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. वुहानमध्ये 80 ते 100 भारतीय अडकून पडले असल्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी 20 फेब्रुवारी रोजीच विमान चीनसाठी झेपावणार होते, पण शेजारी देशाकडून याकरता मंजुरी मिळाली नव्हती. भारतीय वायुदलाच्या विमानाने गाजियाबादच्या हिंडन वायुतळावरून उड्डाण भरल्याचे समजते. 25 फेब्रुवारी रोजी या विमानासाठी चीनकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱयाने दिली आहे.
दक्षिण कोरिया, इराण आणि इटलीचा अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचनेद्वारे या तीन देशांमधून येणारे किंवा 10 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या प्रवाशांना 14 दिवस देखरेखीत ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रशियाही सतर्क
इटली, इराण, दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण पाहता स्वतःच्या नागरिकांना या देशातील प्रवासासंबंधी रशियाकडून निर्देश दिले गेले आहेत. या देशांमधील स्थिती सुधारत नाही तोवर तेथील प्रवास टाळा, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने यापूर्वी जपानी जहाजावरील स्वतःच्या 8 नागरिकांना बाहेर काढले असून यातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरियात 1146 रुग्ण
दक्षिण कोरियात अमेरिकेचा एक सैनिक कोरोनाने पीडित असल्याचे समोर आले आहे. हा सैनिक डेगू शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील कॅरोल तळावर तैनात होता. सैनिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सैन्याने बुधवारी दिली आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 1146 रुग्ण आढळून आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इराणचे आरोग्यमंत्री तसेच एक खासदारही कोरोनाने ग्रस्त आहे. इराणमध्ये आतापर्यंत 19 जणांना जीव गमवावा लागला
आहे.
जगभरात 81005 रुग्ण
जगभरात कोरोना विषाणूचे मंगळवारपर्यंत एकूण 81005 रुग्ण आढळून आले आहेत. जगातील अनेक देश चीनला मदतसामग्री पुरविण्यासाठी तसेच स्वतःच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विमाने पाठवत आहेत. या सर्वांना चीन अनुमती देत असला तरीही भारतीय विमानोड्डाणांना मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप भारतीय विदेश मंत्रालयाने केला होता. यावर चीनने हुबेईत स्थिती गंभीर असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
आशिया, युरोप, मध्यपूर्व
आशिया, युरोप आणि मध्यपूर्वेच्या अनेक भागांमध्ये विषाणू वेगाने फैलावला आहे. संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांतर्गत शहरांची नाकेबंदी केली जात आहे. तर संशयित रुग्ण आढळून आल्याने कॅनरी आयलँड आणि ऑस्ट्रियातील हॉटेल बंद करण्यात आले आहे. ब्रूस आइलवार्ड या देशाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले
आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूने एकाचा जीव घेतल्याने चिंता वाढली आहे.