ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबिया (वय-38) याची पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात कबड्डी सामना सुरू असताना अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास धक्कादायक घटना घडली.
जालंधर ग्रामीण पोलीस उपाधिक्षक लखविंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर जिल्ह्यातील शाहकोट येथील मल्लिया कला गावात सोमवारी एक कबड्डी स्पर्धा सुरू होती. संदीप नांगल या स्पर्धेसाठी आला होता. सामना सरू असताना आपल्या काही साथीदारांना सोडण्यासाठी तो ग्राऊंडबाहेर आला असता त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जवळपास 20 राउंड फायर केले. यात गंभीर जखमी झालेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू केली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सिंह यांनी सांगितले.