वृत्तसंस्था/ मेलबोर्न
कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठय़ा आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तथापि येत्या डिसेबर-जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून ऑस्ट्रेलियन शासनाकडून या दौऱयाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारी संकटाला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन शासनाने खबरदारीचे उपाय अंमलात आणले असून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र चालू वर्षांअखेरीस भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी हवाई वाहतूक नियमातून सवलत दिली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आर्थिक समस्येपासून वाचविण्याकरिता ऑस्ट्रेलियन शासनाकडून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. कोव्हिड-19 संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिक आर्थिक नुकसानीपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कि खकेट संघाचा नियोजित ऑस्ट्रेलिया दौरा काही अडचणीमुळे रद्द झाला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे 300 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या नुकसानीला तोंड द्यावे लागेल.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावरील क्रिकेट ठप्प झाले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व स्थानिक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर अधिक आर्थिक दडपण आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कर्मचाऱयाच्या वेतनामध्ये 80 टक्के कपात करण्यात आली आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणाऱया दौऱयामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयाला ऑस्ट्रेलिया शासनाकडून हिरवा कंदील दाखला गेला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक स्थितीमध्ये थोडी सुधारणा होवू शकेल. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रालियन शासनाने 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व सीमारेषा सील केल्या आहेत. तथापि यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवाई वाहतूकीच्या निर्बंधाचा कालावधी वाढविला जाईल, असे वाटते. दरम्यान पुढील उन्हाळी मौसमात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल होईल. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय नियमामध्ये सूट दिली जाईल. ऑस्ट्रेलियन शासनाकडून या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पाठिंबा मिळेल, असे वाटते.
या दौऱयातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे 500 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या रेव्हिन्यूची अपेक्षा आहे. प्रामुख्याने प्रक्षेपण हक्कातून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिक रक्कम मिळेल. जर या दौऱयावेळी क्रिकेट शौकिनांना सामना पाहण्यास परवानगी दिली नाही तर क्रिकेट हा प्रकार केवळ टीव्ही माध्यमाचा ठरेल. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे 50 दशलक्ष डॉलर्सच्या कमाईला मुकावे लागेल. जर भारताचा हा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाला तर मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आर्थिक स्थिती चिंताजनक बनेल. ऑस्ट्रेलियातील कोरोना व्हायरसमुळे ठप्प झालेल्या क्रीडा हालचाली पुन्हा सुरू करण्याकरिता सर्व पर्यायी सुविधांचा शासनाकडून गंभीरपणे विचार चालू असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.