‘कोव्हॅक्स प्रोग्राम’मधून भारतीय लस बाहेर
नवी दिल्ली, वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आपल्या ‘कोव्हॅक्स प्रोग्राम’मधून कोव्हॅक्सिन या भारतीय लसीला काढून टाकले आहे. पाहणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने ही बंदी घातल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कंपनीने या घोषणेच्या एक दिवस आधीच लसीचे उत्पादन कमी करत असल्याचे जाहीर केले होते. तथापि, डब्ल्यूएचओने घेतलेल्या या निर्णयानंतर लसनिर्माता कंपनी भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे. कोविडपासून बचाव करण्यासाठी कोव्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्यांसाठीही लसीकरण प्रमाणपत्रे वैध असल्याचे नमूद केले आहे.
विदेशी लसींना टक्कर देत कोरोना विषाणूवर प्रभावी ठरलेली आणि सुरक्षितता सिद्ध केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी दणका दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) माध्यमातून होणारा लसीचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. या लसीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठय़ावरच संघटनेने बंदी घालत असल्याचे जाहीर केल्याने भारताला धक्का बसला आहे.
मागील वर्षीपासून हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन घेतले जात आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) मदतीने कंपनीने ही लस विकसित केली आहे. भारतातील पहिली स्वदेशी लस म्हणून या लसीने आपली गुणवत्ता जागतिक स्तरावरही सिद्ध केली आहे. पण त्याला आता मोठा धक्का बसला आहे.
उत्पादन पद्धतीत त्रुटी?
ही लस सुरक्षित असून त्याबाबत कोणतीही अडचण नाही, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. मात्र, उत्पादनाच्या पद्धतीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग पॅक्टिसेस’मध्ये (जीएमपी) काही त्रुटी आढळून आल्या आहेत. अलीकडेच इमर्जन्सी युज लिस्टिंगअंतर्गत केलेल्या पाहणीत या त्रुटी आढळल्या आहेत. त्यानुसार कंपनीकडून उत्पादन सुविधा अद्ययावत करणे आणि निरीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी बंदीच्या काळात दूर कराव्यात, असे संघटनेने म्हटले आहे. यापूर्वी जागतिक स्तरावर आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यासही संघटनेने विलंब लावला होता.
सुविधा ऑप्टिमायझेशनसाठी कंपनीकडून उत्पादनात घट
सुविधा ऑप्टिमायझेशनसाठी कंपनी कोव्हॅक्सिनचे उत्पादन कमी करत आहे. येत्या काळात आम्ही ते पुन्हा अद्ययावत स्वरूपात आणू. यासाठी कंपनी आपली देखभाल, उत्पादन प्रक्रिया आणि स्टोरेज सुविधा वाढवण्यावर भर देणार आहे. गेल्या वर्षभरात उत्पादन सुरू ठेवल्यामुळे कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी सर्व विद्यमान सुविधा अद्ययावत करण्यात आल्याचे हैदराबादमधील भारत बायोटेकच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.