नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने शुक्रवारी ग्रीको रोमन कुस्ती प्रशिक्षक तेमो कॅझाराश्विली यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी केली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एकही ग्रीको रोमन मल्ल पात्र ठरु न शकल्याने हा निर्णय घेण्यात आला. तेमो हे मूळ जॉर्जियाचे आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांना भारताच्या ग्रीको रोमन मल्लांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केले होते.
यंदाच्या ऑलिम्पिकसाठी फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये भारताचे 4 पुरुष व 4 महिला असे एकूण 8 मल्ल पात्र ठरले. मात्र, याचवेळी देशाला ग्रीको रोमन गटात अगदी एकही पात्रता संपादन करता आली नाही. भारतीय कुस्ती फेडरेशनच्या शिफारशीनुसार त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने यावेळी नमूद केले. क्रीडा प्राधिकरणाने तेमो यांच्याशी ऑलिम्पिकपर्यंत करार केला होता.
‘आम्ही ऑलिम्पिक हेच मुख्य लक्ष्य समोर ठेवून तेमा कॅझाराश्विली यांना करारबद्ध केले होते. पण, काहीही हाताशी न आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. तेमो यांचा करार ऑगस्टपर्यंत आहे. मात्र, या कालावधीपर्यंत आणखी कोणतेही शिबिर नसल्याने तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे काहीच कारण नव्हते’, असे भारतीय कुस्ती फेडरेशनचे महासचिव राजीव तोमर म्हणाले.
ऑलिम्पिकनंतर ग्रीको रोमन मल्लांसाठी नवा विदेशी प्रशिक्षक नियुक्त केला जाईल, याचा त्यांनी येथे उल्लेख केला. भारतीय कुस्ती फेडरेशनने इराणचे होसेन करिमी (फ्री स्टाईल) व अमेरिकेचे ऍन्डय़्रू कूक (महिला संघ) या प्रशिक्षकांनाही पदमुक्त केले. या उभयतांच्या अटींची पूर्तता करणे कठीण होते, असे फेडरेशनने म्हटले.