नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीनं सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा दाखवला होता. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा मागे घेतला. ट्विटरने आपल्या वेबसाइटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला आपल्या वेबसाइटवर दोन स्वतंत्र देश म्हणून दाखवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. या एफआयआरमध्ये ट्विटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या नावाचा समावेश आहे.
बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर, ट्विटरने हा चुकीचा नकाशा काढून टाकला आहे. ‘ट्विटर इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ (२) आणि आयटी अधिनियम २००८ च्या कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटरच्या वेबसाईटवरील करिअर विभागात हा नकाशा दिसत होता. नेटिझन्सनी याचा निषेध करत ट्विटरवर कठोर कारवाईची मागणी केली होती. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता. या मुद्यावर ट्विटरला पाठवलेल्या ई-मेलला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.