आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ दुबई
भारताची सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर एमसी मेरी कोमला येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 51 किलो वजन गटात अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत तिला कझाकच्या नझीम कीझायबेकडून पराभव पत्करावा लागला.
मेरी कोमला या लढतीत 2-3 असे पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेत तिने मिळविलेले हे आजवरचे सातवे पदक आहे. 2003 मध्ये झालेल्या स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक मिळवित त्याची सुरुवात केली होती. तिच्यापेक्षा 11 वर्षांनी तरुण असलेल्या नझीमविरुद्ध 38 वर्षीय मेरी कोमने प्रभावी सुरुवात करीत पहिली फेरी जिंकून आघाडी घेतली. या फेरीत तिने प्रतिआक्रमणावर जास्त भर दिला होता. दुसऱया फेरीत मात्र दोघींनीही आक्रमक खेळ करीत एकमेकावर हल्ले चढविले. जॅब्सचा परिपूर्ण वापर करीत नझीमने या फेरीत बाजी मारून बरोबरी साधली. शेवटच्या तीन मिनिटांत मेरी कोमने जबरदस्त ठोसेबाजी करीत आक्रमण केले. पण पंचांचा कौल तिच्या बाजूने मिळाला नाही. मेरी कोमला 5000 डॉलर्सचे तर नझीमला 10,000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले. नझीम कीझायबे दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन असून सहा वेळा तिने राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळविली आहे.
सोमवारी अमित पांघल (52 किलो), शिवा थापा (64 किलो), संजीत (91 किलो) यांच्या अंतिम लढती होणार आहेत. पांघलची लढत ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन उझ्बेकच्या शाखोबिदिन झोइरोव्हविरुद्ध होणार आहे. याशिवाय सिमरनजित कौर, विकास कृष्णन, लवलिना बोर्गोहेन, जस्मिन, साक्षी चौधरी, मोनिका, सवीती, वरिंदर सिंग या आठ जणांना कांस्यपदके मिळाली आहेत. या सर्वांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या सर्वाना प्रत्येकी 2500 डॉलर्सचे बक्षीसही मिळाले.