वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील टोरेमिरोना रिलेस येथे झालेल्या सामन्यात भारताच्या यू-17 महिला फुटबॉल संघाला स्वीडन महिला संघाकडून 1-3 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. भारतात होणाऱया यू-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. भारताचा या दौऱयातील हा पहिलाच सामना होता.
सुधा तिर्कीने 62 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल केला. स्वीडनचे गोल इदा ग्रॅमफोर्स, सारा फ्रिगेन, सेल्मा ऍस्ट्रम यांनी नोंदवले. भारतीय महिलांनी या सामन्यात सुरुवातीला स्वीडनच्या तोडीस तोड खेळ केला. प्रारंभी अनिता कुमारीला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण तिचा फटका स्वीडनच्या गोलरक्षकाने अडविला. काही मिनिटानंतर नीतू लिंडाने पेनल्टी क्षेत्रातून गोलच्या दिशेने फटका मारला होता. पण तो ब्लॉक करण्यात आला.