वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कैरोतील नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय शॉटगन पथकासमवेत दाखल झालेले शॉटगन प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना ताबडतोब विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने सांगितले.
इजिप्तच्या राजधानीत दाखल झाल्यानंतर भारताच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र बाधित असल्याचा अहवाल आलेल्या प्रशिक्षकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यांचा अहवाल सकारात्मक आला असला तरी भारताच्या इतर सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली प्रशिक्षक असून त्यांची एक-दोन दिवसात पुन्हा चाचणी होणार आहे. आयोजकांनी तयार केलेल्या कोरोना नियमावलीनुसार दर 72 तासांनी सहभागी संघांतील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी घेतली जाते. भारताने या स्पर्धेत सांघिक स्कीटमध्ये कांस्य व कंपाऊंड रिकर्व्हमध्ये वैयक्तिक व सांघिक अशी तीन सुवर्णपदके मिळविली आहेत.