ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
देशात 18 वर्षांखालील मुलांसाठी कोणतीही लस नाही आणि बऱ्याच राज्यांमध्ये लसीच्या कमतरतेमुळे 18 वर्षावरील लोकांनादेखील लस मिळत नाही. दरम्यान, भारतातील कोरोनाची नेजल लस मुलांसाठी गेमचेंजर ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या, नेजल लस नाकातून दिली जाते. ती इंजेक्शनद्वारे दिलेल्या लसीपेक्षा अधिक प्रभावी असते. नाकाची लस घेणेही सोपे आहे. मला विश्वास आहे की, भारतात बनवलेली नेजल लस मुलांसाठी गेमचेंजर असू शकते.
हैदराबादेतील भारत बायोटेक या फार्मा कंपनीने ‘कोवॅक्सिन’च्या निर्मितीनंतर एक नेजल स्प्रेद्वारे घेतली जाणारी लसही तयार केली आहे. या नेजल लसीची चाचणी सध्या सुरू आहे. नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये या स्प्रेचे प्रत्येकी दोन थेंब टाकले जातील. आतापर्यंत क्लिनिकल चाचणीदरम्यान 175 लोकांना नेजल लस देण्यात आली आहे.