ऑनलाईन टीम / लंडन :
भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ लंडनमधील नागरिकांनी तेथील भारतीय दुतावासासमोर रविवारी जोरदार निदर्शने केली. भारतविरोधी घोषणाबाजी करत खलिस्तानवाद्यांचे झेंडेही फडकवण्यात आले. ब्रिटनच्या लंडनस्थित भारतीय उच्चायोगाने याबाबतची माहिती दिली आहे.
लंडनमधील भारतीय दुतावासासमोर मागील काही दिवसांपासून तेथील शीख तरुण निदर्शने करत होती. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली होती. लंडनमध्ये शीख समुदायाचे प्रमाण मोठे आहे. त्यात काही खालिस्तान समर्थक संघटना आहेत.
भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या या आंदोलनासाठी केवळ 30 लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत 3500 ते 4000 लोक एकत्र जमले होते. तसेच यावेळी काढलेल्या रॅलीत 700 वाहने असल्याचे उच्चायोगाने म्हटले आहे. आंदोलनाची लंडनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची दखल घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले. तसेच काही समाजकंटकांना ताब्यातही घेण्यात आले.