ऑनलाईन टीम / लखनऊ :
भारतातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपाचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष नरेश पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली.
देशातील सर्वात उंच व्यक्ती असलेले धर्मेंद्र प्रताप हे 46 वर्षांचे आहेत. धर्मेंद्र यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. धर्मेंद्र प्रताप सिंह प्रतापगड जिल्ह्यातील नरहरपूर कासियाही गावचे आहेत. गेल्या वर्षी उत्तरप्रदेश पंचायत निवडणुकांदरम्यान त्यांनी आपल्या एका सहकाऱ्यासाठी प्रचार केला होता. यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी समाजवादी पक्षाची धोरणं आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्तावर विश्वास दाखवत सपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाचं बळ वाढेल असा विश्वास नरेश पटेल यांनी व्यक्त केला.