स्पॅम अन् नको असलेले संदेश रोखण्यासाठी उचलले पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपने ऑगस्टमध्ये भारतातील 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांची अकौंट्स बंद केली आहेत. ही कारवाई भारतातील आयटी नियम आणि व्हॉट्सऍपच्या सेवा अटींचा उल्लंघन करणाऱया अकौंट्सच्या विरोधात करण्यात आली आहे. व्हॉट्सऍपच्या मंथील कंप्लायन्स अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
व्हॉट्सऍपने भारतातील 16 जून ते 31 जुलैपर्यंत 3 लाख अकौंट्स बंद केली होती. ही कारवाई 594 तक्रारींच्या आधारावर करण्यात आली होती. जगभरात गैरवापराच्या प्रकरणांवर व्हॉट्सऍप दर महिन्याला सरासरी 80 लाख अकौंट्सवर बंदी घालते.
तक्रारींच्या आधारावर कारवाई
अनुमतीशिवाय ऑटोमॅटेड किंवा बल्क मेसेज पाठविण्यात आल्याने 20 लाख 70 हजार अकौंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार ऑगस्टमध्ये व्हॉट्सऍपला 420 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात अकौंट सपोर्टच्या 105, बंदीची मागणी करणाऱया 222, प्रॉडक्ट सपोर्टच्या 42, सिक्युरिटीच्या 17 आणि अन्य सपोर्टच्या 34 तक्रारी सामील होत्या.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर
युजर सिक्युरिटी रिपोर्टमध्ये तक्रारींची माहिती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्सऍप स्वतःची कारवाई सुरूच ठेवणार आहे. आमचे लक्ष प्लॅटफॉर्मवर स्पॅम आणि नकोसे असलेले मेसेजेस रोखण्यावर असल्याचे व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. कम्प्लेंट चॅनेलच्या माध्यमातून वापरकर्ते तक्रारी नोंद करतात. मेसेजिंग ऍप प्लॅटफॉर्मवर हार्मफुल बिहेवियर (धोकादायक वर्तन) रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल्स आणि स्रोतांचा वापर करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
अहवाल प्रकाशनाची सक्ती
भारत सरकारने 26 मे रोजी नवे आयटी नियम लागू केले होते. या नियमांनुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असणाऱया कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात मिळालेल्या तक्रारी आणि त्यांच्या आधारावर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील द्यावा लागतो.
वापरकर्त्याचे खासगीत्व
कुठल्याही वापरकर्त्याचा संदेश न वाचण्यावर व्हॉट्सऍपने जोर दिला आहे. हे एक एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहे. यात वापरकर्त्याची माहिती सुरक्षित आहे. प्लॅटफॉर्म कारवाईसाठी उपलब्ध अन-एन्क्रिप्टेड माहितीवर अवलंबून आहे. यात युजर रिपोर्ट, प्रोफाइल फोटो, ग्रुप फोटो आणि ग्रुप डिस्क्रिप्शन सामील आहे.