ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टानंतर भारतात कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. हा व्हेरिएंट सात दिवसांत रुग्णाचे वजन कमी करू शकतो. ब्राझीलमध्ये सापडलेल्या या व्हेरिएंटचा एकच प्रकार आतापर्यंत भारतात आढळला होता. मात्र, आता ब्राझीलमधील हे दोन्ही व्हेरिएंट भारतात आले आहेत. हा दुसरा प्रकार बी.1.1.28.2 असून, तो जास्त संक्रमणकारक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सीरियन हॅम्स्टरमधील चाचण्यांमध्ये (उंदराची एक प्रजाती) असे दिसून आले की, या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याने सात दिवसांच्या आत संबंधित व्यक्ती ओळखला जाऊ शकतो. हा व्हेरिएंट शरीराचे वजन वेगाने कमी करू शकतो. तो डेल्टाप्रमाणे अधिक गंभीर आहे.
पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या डॉ. प्रज्ञा यादव म्हणाल्या, बी.1.1.28.2 हा प्रकार बाहेरून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळला. जीनोमची तपासणी केल्यानंतर त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी आम्ही चाचणीही घेतली. आतापर्यंत भारतात याची फारशी प्रकरणे नाहीत. डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त मिळत आहेत. मात्र, सतर्कता खूप महत्वाची आहे. कारण यामुळे शरीरातील अँटिबॉडीजची पातळी देखील कमी होते आणि पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.