वृत्तसंस्था / लेह
सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण लडाखमध्ये भारताने जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता तयार केला आहे. 18,600 फुटांच्या उंचीवर निर्माण करण्यात आलेला हा मार्ग लेहपासून (जिगराल-तांगत्से) केला खिंडीला पार करून पँन्गॉग सरोवरापर्यंत 41 किलोमीटरचे अंतर कमी करणार आहे. सैन्याच्या 58 इंजिनियर रेजिमेंटने या मार्गाची निर्मिती केली आहे. हा मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
लडाखचे भाजप खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी याचे उद्घाटन केले आहे. हा रस्ता सामरिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. 18,600 फुटांच्या उंचीवर निर्माण करण्यात आलेला हा मार्ग वाहन चालविण्यायोग्य असलेला जगातील सर्वाधिक उंचीवरील मार्ग आहे. आतापर्यंत खारदुंगला दर्रा 18,380 फुटांच्या उंचीवर जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता होता असे नामग्याल म्हणाले.
पर्यटनासाठी लाभदायक
हा रस्ता भविष्यात स्थानिक रहिवासी, विशेषकरून लडाखच्या लालोक क्षेत्रातील लोकांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणार आहे. या मार्गामुळे येथील पर्यटनाच्या सुविधांमध्ये विस्तार होईल. जगातील सर्वाधिक उंचीवरील मार्ग, दुर्लभ वनौषधी, स्नो स्पोर्ट्समध्ये भाग घेणे, सुंदर सरोवर पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागतील असे नामग्याल यांनी म्हटले आहे.