पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण : पायाभूत सुविधांना जागतिक दर्जा मिळवून देण्याकरता काम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम समर्पित प्रेट कॉरिडॉरच्या 306 किलोमीटर लांबीच्या रेवाडी-न्यू मदार विभागाचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी केले आहे. तसेच इलेक्ट्रिक ट्रक्शनने धावणाऱया डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर (डबलडेकर) रेल्वेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे. देशाच्या पायाभूत क्षेत्राला जागतिक दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने नवा वेग प्राप्त केल्याचे मोदी म्हणाले.
केवळ 10-12 दिवसांच्या कालावधीत डिजिटल हस्तांतरणाद्वारे शेतकऱयांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. चालकरहित मेट्रो, ओडिशात आयआयटी केंद्राचे उद्घाटन केले. देशात 450 किलोमीटर लांबीची मंगळूर-कोची गॅस पाईपलाइनचा शुभारंभ केल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भविष्यात आणखी जलद वाटचाल
दोन लसींनी देशवासीयांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. कोरोनाच्या प्रारंभापासूनच लसनिर्मितीच्या कार्याचा वेग पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली असेल. आम्ही थकणार नाही, तसेच थांबणार नाही, वेगाने पुढे जात राहू असे मोदी म्हणाले.
मालगाडय़ांचा वेग तीनपट
प्रेट कॉरिडॉरकडे सध्या गेमचेंजरच्या स्वरुपात पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी न्यू भाउपूर-खुर्जा प्रकल्प सुरू झाला असून त्या मार्गावर मालगाडय़ांचा वेग 90 किलोमीटर प्रतितासापर्यंत नेंदविला गेला आहे. हा आकडा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. भारताच्या विकासाला असाच वेग हवा, असे मोदींनी म्हटले आहे.
शेतकरी उद्योगांना नव्या संधी
राजस्थानच्या न्यू किशनगंजसाठी आज डबलडेकर मालगाडी रवाना झाली आहे. आजचा दिवस एनसीआर, हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकरी, उद्योजक, व्यापाऱयांसाठी नव्या संधी, अपेक्षा घेऊन आला आहे. आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती जीवनासह व्यापारासाठीही आवश्यक आहे. याच्याशी संबंधित कामे अर्थव्यवस्थेच्या इंजिन्सना वेग प्रदान करत असतात. यातून अनेक क्षेत्रांमध्येही रोजगार प्राप्त होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मोठय़ा उत्पादकांना लाभ
मालवाहतुकीच्या या नव्या कॉरिडॉरमध्ये 133 स्थानकांचा अंतर्भाव होत आहे. या रेल्वे स्थानकांवर मल्टीलेव्हल पार्क, कंटेनर डेपो, कंटेनर टर्मिनल तयार केले जाणार आहेत. यांचा लाभ आमचे गरीब, ग्रामीण भागातील लोक तसेच शेतकऱयांना होणार आहे. तसेच मोठय़ा उत्पादकांना अनेक संधी उपलब्ध करून देणार असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत
रेल्वेकडून कौतुकास्पद कामगिरी
मागील 6 वर्षांमध्ये रेल्वेमार्गांचे रुंदीकरण आणि विद्युतीकरणावर प्रचंड काम झाले आहे. भारतात आता सेमी-हायस्पीड रेल्वे धावत आहे. भारतीय रेल्वे मेक-इन -इंडिया तसेच उत्तम अभियांत्रिकीचे उदाहरणही ठरत आहे. भारतीय रेल्वे अशाचप्रकारे देशाची सेवा करत राहणार असल्याची अपेक्षा असल्याचे मोदी म्हणाले.