ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम नेपाळच्या सीमेवर असलेल्या राज्यांवर वेगळ्या पद्धतीने होत आहे. भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये पेट्रोल जवळपास 22 रुपये स्वस्त असल्याने नेपाळमधून भारतात पेट्रोलची तस्करी सुरू झाली आहे. नेपाळ सीमेवरच्या काही लोकांना स्थानिक पोलीस आणि एसएसबी जवानांनी याप्रकरणी अटक केली आहे.
बिहारमधील अरारिया आणि किशनगंज जिल्ह्यातून अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सध्या अरारियामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93.50 रुपये आहे, तर नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत 70.62 रुपये आहे. नेपाळमधून पेट्रोलची तस्करी सुरू झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल विक्रीवर परिणाम होत आहे. मात्र, आता पोलीस याबाबत सतर्क झाले आहेत. एसएसबीचे डीआयजी एसके सारंगी यांनी सांगितले की, सीमाभागात टेहळणी कडक करण्यात आली आहे. किशनगंज जिल्ह्यातील स्थानिक पोलीसही गस्त घालत एसएसबीला मदत करत आहेत.
दरम्यान, दोन्ही देशांमधील जुन्या करारानुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आखाती देशांमधून नेपाळला पेटकॉन आयात करते. हे पेट्रोल नेपाळला खरेदी किंमतीत विकले जाते आणि फक्त रिफायनरी शुल्क आकारले जाते. त्यामुळेच नेपाळमध्ये पेट्रोल स्वस्त आहे.