ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टू स्टार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंडियन एअर फोर्सची एक टीम सध्या फ्रान्समध्ये ‘राफेल’ फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोहोचली आहे. पुढच्या काही आठवडयात अंबाला एअर बेसवर राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी दाखल होईल, अशी माहिती गुरुवारी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ते म्हणाले, फ्रान्सला 36 राफेल विमानांची भारताने ऑर्डर दिली आहे. 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर त्यातील पाच विमाने दाखल झाली. ही विमाने एक दिवस फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर थांबली होती. राफेल विमाने 10 सप्टेंबरला औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली.
आणखी तीन ते चार राफेल विमाने पुढच्या काही आठवडयात भारतात दाखल होतील. भारताची हवाई शक्ती चीन-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना, 4.5 जनरेशनच्या या फायटर विमानांमुळे कैकपटीने वाढणार आहे. राफेल अनेक विमानांचे काम एकटे करु शकते.
राफेल विमाने भारताकडे दर दोन महिन्यांच्या अंतराने तीन ते चार सोपवली जातील अशी अपेक्षा इंडियन एअर फोर्सला आहे. रशियन सुखोई-30 विमाने जून 1997 मध्ये इंडियन एअर फोर्सला मिळाल्यानंतर 23 वर्षांनी नवीन फायटर विमान एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झाले आहे. सध्या चीन बरोबर प्रचंड तणाव असलेल्या लडाख क्षेत्रातही, गरज पडल्यास राफेल विमानांचा वापर करण्यासाठी आयएएफ सज्ज आहे. चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे येथे लष्कर हाय-अलर्टवर आहे.
दरम्यान, ही विमाने चालवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वैमानिकांना खास प्रशिक्षण दिले जात आहे.