वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोविड-19 महामारीचा प्रकोप समाप्त झाल्याची चुकीची धारणा भारताने तयार केली. योग्यवेळेपूर्वीच भारताने निर्बंध शिथिल केल्याने तो आता ‘गंभीर संकटा’त सापडला आहे. भारत कोरोना महामारीच्या अभूतपूर्व दुसऱया लाटेमुळे अत्यंत प्रभावित झाला असून अनेक राज्यांमधील रुग्णालये आरोग्य कर्मचारी, लसी, ऑक्सिजन, औषधे आणि बेड्सच्या तुटवडय़ाला तोंड देत असल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ साथरोगतज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी म्हटले आहे.
डॉक्टर फाउची यांनी कोविड-19 विषयक सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार तसेच पेन्शन समितीसमोरील सुनावणीत भूमिका मांडली आहे. भारतात प्रत्यक्षात कोरोना संक्रमणात वाढ असताना ते समाप्त झाल्याची चुकीची धारणा तयार झाली. भारताने योग्यवेळेपूर्वीच निर्बंध शिथिल केले आणि तेथे संसर्ग टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. तसेच तो किती विध्वंसक आहे हे देखील दिसून आल्याचे फाउची यांनी म्हटले आहे.
डॉ. फाउची हे अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शन्स डिसिजेच’चे संचालक असून अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. सुनावणीच्या अध्यक्षा सिनेटर पॅटी मुर्रे यांनी भारतात हाहाकार घडवून आणणाऱया कोविड-19 ची लाट सर्वच ठिकाणाहून याचे उच्चाटन होईपर्यंत अमेरिका देखील ती समाप्त करू शकत नसल्याचे दर्शवून देत असल्याचे म्हटले आहे.
बायडेन प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सामील होत जागतिक लढाईचे नेतृत्व करणे सुरू केले आहे. तसेच 4 जुलैपर्यंत 6 कोटी ऍस्ट्राजेनेका लसीचे डोस अन्य देशांना देण्याची प्रतिबद्धता व्यक्त करून जागतिक लसीकरण प्रयत्नांना आर्थिक मदत करत असल्याचे मुर्रे यांनी म्हटले आहे.
भारतातील हा प्रकोप या जागतिक महामारी तसेच भविष्यातील प्रकोपांबद्दल योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी अमेरिकेच्या मजबूत सार्वजनिक आरोग्य संरचनेच्या आवश्यकतेला अधोरेखित करत असल्याचे मुर्रे यांनी म्हटले आहे.
भारतातील प्रकोपातून अमेरिका काय शिकू शकतो असा प्रश्न फाउची यांना विचारण्यात आला होता. स्थिती कधीच कमी लेखू नये हा धडा यातून मिळाला आहे. तसेच भविष्यातील महामारींकरता स्थानिक जनआरोग्य सुविधांची निर्मिती सुरूच ठेवण्याची गरज असल्याचे फाउची यांनी सांगितले आहे.
जागतिक प्रयत्नांची गरज
ही जागतिक महामारी असल्याने याकरता जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचा धडा यातून मिळाला आहे. प्रत्येकाला जबाबदारीकडे लक्ष द्यावे लागणार आहे, हे केवळ स्वतःच्या देशाबद्दल नव्हते तर दुसऱया देशांसोबत सामील होण्याचीही गरज आहे. जगाच्या कुठल्याही हिस्स्यात विषाणूचा प्रकोप सुरू राहिल्यास अमेरिकेतही त्याचा धोका राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.