32 कोटी 36 लाख डोस पूर्ण – अमेरिकेत आतापर्यंत 32.33 कोटी जणांना लस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने रविवारी 32.36 कोटींचा टप्पा पार केला. सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जगात अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 जणांच्या लसीकरणाची नोंद झाली होती. हा टप्पा भारताने अमेरिकेपेक्षाही कमी अवधीमध्ये पार केला आहे.
कोरोनावर मात करायची असेल तर आज लस एकमात्र उपाय आहे. हे सरकारदेखील जाणून आहे. त्यामुळेच तिसऱया लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. डिसेंबरच्या आधी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली.
भारतात गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लसी देण्यात आल्या. कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली होती. भारतात 21 जूनला एका दिवसात सर्वाधिक 85 लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले होते. कोरोना विरोधातील लढय़ात महत्त्वाचे ठरणाऱया लसीकरणात भारताने आता वेग घेतला आहे.
जगात सर्वात प्रथम इंग्लडने 8 डिसेंबर 2020 रोजी लसीकरणास सुरुवात केली होती. त्यानंतर अमेरिकेने 14 डिसेंबर रोजी लसीकरणास प्रारंभ केला. या दोन महत्त्वाच्या देशांबरोबरच इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्येही लसीकरण डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाले होते. भारताने 16 जानेवारी रोजी लसीकरणास प्रारंभ केला. लसीच्या तुटवडा भासत असतानाही भारताने मोठी मजल मारली आहे.