ऑनलाईन टीम / लेह :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनने मोठ्या प्रमाणात सैन्य आणि शस्त्रसाठा जमवल्याने भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे. भारतीय लष्करानेही गलवान खोऱ्यात 14 हजार फूट उंचीवर सहा टी-90 रणगाडे तैनात केले आहेत.
चीनने कोणत्याही प्रकारे हल्ला केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने ठेवली आहे. लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या 1597 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह 155 एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चुशुल सेक्टरमध्ये दोन टँक रेजिमेंट देखील तैनात आहेत. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य बळ वाढवले आहे.
दरम्यान, शुक्रवारी भारताने लेहमध्ये लष्कर आणि वायुदलाचा संयुक्त सराव घेत चीनला आपली संयुक्त ताकद दाखवून दिली आहे. या युद्धसरावामध्ये लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी झाली होती.