ऑनलाईन टीम / लेह :
लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन भारताला घेरण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) एक नवीन हवाई तळ उभारत आहे. शिनजियांग प्रांतातील शाकचे भागात हा हवाई तळ उभारण्यात येत असून, या तळामुळे चिनी हवाई दलाची कमतरता पूर्ण होणार आहे.
लढाऊ विमानांसाठी चीन उभारत असलेला नवीन हवाई तळ चीनच्या काशगर आणि होगान या दोन्ही हवाई तळाच्यामध्ये येतो. शाकचे येथील या हवाई तळाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
उत्तराखंड सीमेवरील बाराहोटी हवाई क्षेत्रातही चीन सक्रिय आहे. मानवरहित उड्डाण करणारी विमाने चीन मोठ्या संख्येने या भागात आणत आहे. भारतीय एजन्सीदेखील या हवाई क्षेत्रावर बारीक लक्ष ठेवून आहेत. चिनी हवाई दलाने उन्हाळ्याच्या सुरुवातीला भारतीय प्रदेशांजवळ एक युद्धसराव केला होता. हा युद्धसराव प्रामुख्याने होगन, काशगर आणि गार गुन्सा हवाई क्षेत्रातून केला होता.