ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांचे प्रतिपादन, मालिकेला 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ
वृत्तसंस्था / मेलबर्न
पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्वाची रजा घेत आहे, त्याबद्दल मला व्यक्तिशः आदर आहे. मात्र, त्याच्या गैरहजेरीचा भारतीय संघाला निश्चितपणाने फटका बसेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी व्यक्त केले आहे. उभय संघात प्रथम मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका होईल. त्यानंतर बहुप्रतिष्ठित कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. यातील ऍडलेड येथील पहिली कसोटी पूर्ण झाल्यानंतर विराट कोहली मायदेशी रवाना होणार आहे.
ऍडलेड येथील पहिली कसोटी दि. 21 डिसेंबर रोजी पूर्ण होईल. जानेवारी महिन्यात विराट व त्याची पत्नी अनुष्का यांना पहिल्या अपत्याची प्रतीक्षा असून त्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीला पितृत्वाची रजा मंजूर केली आहे.
दरम्यान, विराट कोहलीने क्रिकेटपेक्षा आपल्या कुटुंबाला अधिक प्राधान्य दिल्याबद्दल जस्टीन लँगरने त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला. ‘विराट कोहली हा मी माझ्या कारकिर्दीत पाहिलेला सर्वोत्तम खेळाडू आहे आणि यासाठी अनेक कारणे आहेत. पण, त्याची केवळ फलंदाजीच नव्हे तर त्याचा उत्साह, खेळाप्रती तळमळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. क्षेत्ररक्षणातील त्याची चपळता देखील निश्चितच वाखाणण्याजोगी आहे’, असे लँगरने शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवरुन बोलताना सांगितले.
‘तो जितका उत्साह कायम राखतो, त्याचा स्तर अविश्वसनीय आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल यासाठी खूपच आदर आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी त्याने पितृत्वाची रजा घेतली, याबद्दल मला त्याचा आदर आहे. विराट देखील आपल्या सर्वांपैकी एक आहे. अगदी माझ्या संघातील कोणी खेळाडू आपल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असेल तर त्याला देखील मी हाच सल्ला दिला असता, तो आता विराट अंमलात आणत आहे’, असे जस्टीन लँगरने पुढे नमूद केले.
विराट कोहली ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. पण, त्यानंतर मेलबर्नमधील बॉक्ंिसग डे कसोटी (दि. 26 ते 30 डिसेंबर), सिडनीत नव्या वर्षातील पहिली कसोटी (दि. 7 ते 11 जानेवारी) व गब्बा येथील शेवटची कसोटी (15 ते 19 जानेवारी) येथे तो सहभागी होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर लँगरने भारतीय संघाला कसोटी मालिकेत विराटची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवेल, असे म्हटले आहे.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाची 3 वनडे सामन्यांनी सुरुवात होईल व त्यानंतर 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.
मालिकेतील पहिली वनडे दि. 27 नोव्हेंबर रोजी तर पहिली कसोटी दि. 17 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.
विराट कोहली पूर्ण मालिका खेळणार नसल्याने अनुभवी फिरकीपटू नॅथन लियॉन निराश
आगामी कसोटी मालिकेत विराट कोहली फक्त एकच सामना खेळणार असल्याने याबद्दल ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने निराशा व्यक्त केली. कोहली जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाज आहे तर लियॉन त्याच्याविरुद्ध सर्वाधिक वेळा यशस्वी ठरला आहे. यंदा मात्र मर्यादित संधी मिळणार असल्याने लियॉनने त्याच्याविरुद्ध जुगलबंदी रंगू शकणार नाही, याची खंत व्यक्त केली. कसोटी क्रिकेटमध्ये लियॉनने विराटला आतापर्यंत 7 वेळा बाद केले आहे.
‘विराट पूर्ण मालिका खेळणार नाही, असे समजल्यानंतर मी निराश झालो. विराट हा स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने यांच्याप्रमाणेच जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. अर्थात, विराट खेळणार नाही, याचा अर्थ ऑस्ट्रेलिया सरस ठरेल, असा होत नाही. पुजारा, रहाणेसह अन्य काही अव्वल फलंदाज भारतीय संघात समाविष्ट आहेत आणि विराटच्या गैरहजेरीनंतरही भारतीय संघ आमच्यासमोर तगडे आव्हान उभे करेल’, असे लियॉन पुढे म्हणाला.
सलामीवीर जो बर्न्सचे स्थान कायम राहण्याचे संकेत
भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात जो बर्न्सचे संघातील स्थान अबाधित राहू शकते, असे संकेत ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी यावेळी दिले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी दि. 17 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. युवा फलंदाज विल पुकोस्कीचा गुरुवारी जाहीर केल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला गेला. डेव्हिड वॉर्नरचा सहकारी सलामीवीर जो बर्न्स असेल की पुकोस्की याबद्दल मतमतांतरे व्यक्त झाली. त्या पार्श्वभूमीवर लँगर बोलत होते.
‘विल पुकोस्कीचे पहिली कसोटी खेळण्याचे स्वप्न असणे साहजिक आहे. त्यात गैर काहीच नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. आम्हाला युवा खेळाडूंबद्दल आदर आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ज्यांनी अमुल्य योगदान दिले, त्याचीही जाणीव आहे’, असे लँगर म्हणाले. बर्न्स व डेव्हिड वॉर्नर यांच्या योगदानाचा त्यात संदर्भ होता. आयसीसी कसोटी मानांकन यादीतील वाटचालीसाठी वॉर्नर व बर्न्स यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
‘जो बर्न्स व डेव्हिड वॉर्नर यांच्यात आम्ही उत्तम समन्वय पाहिला आहे. ते प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडण्यात काहीही कसर सोडत नाहीत. सध्याच्या घडीला तेच आमचे पहिल्या पसंतीचे सलामीवीर आहेत’, असे लँगरनी शेवटी नमूद केले.