वृत्तसंस्था/ पोश्चेस्ट्रुम
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात बलाढय़ नेदरलँडस्ने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
भारत आणि नेदरलँडस् यांच्यातील या उपांत्य सामन्यात नेदरलँडस्तर्फे टिसा बिटमाने 12 व्या मिनिटाला, लुना फोकीने 53 व्या मिनिटाला तर जीप डिकीने 54 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने प्रथमच यावेळी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 2013 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने कास्यपदक मिळविले होते.
या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत आक्रमक आणि जलद खेळ करत नेदरलँडस्च्या डावपेचाना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय संघातील हुकमी खेळाडू मुमताज खानने आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याची संधी गमविली. कर्णधार सलमा टेटे च्या पासवर मुमताज खान मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेला. पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेल्याने भारताला हा सामना गमवावा लागला. 12 व्या मिनिटाला टिसा बेटमाने चेंडूवर ताबा मिळवीत भारतीय बचावफळीला तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत आपल्या संघाचे खाते उघडले. या स्पर्धेतील हा सर्वोत्तम गोल म्हणावा लागेल. नेदरलँडस्च्या खेळाडूंनी 20 जणांकडे पासेस देत हा गोल केला. मध्यंतरापर्यंत नेदरलँडस्ने 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत नेदरलँडस्कडून दोन गोल नोंदविले गेले. भारतीय संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. नेदरलँडस्ने ही स्पर्धा यापूर्वी तीनवेळा जिंकली असून आता ते चौथ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.