दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी, वांडरर्सवर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच पराभूत ,दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच पराभूत
वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
वांडरर्सवरील दुसऱया कसोटी सामन्यात डीन एल्गारचा (नाबाद 96) करारी बाणा भारताच्या अव्वल दर्जाच्या जागतिक गोलंदाजी लाईनअपविरुद्धही अतिशय कणखरपणे उभा राहिला आणि याचमुळे येथील दुसऱया कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 7 गडी राखून दणदणीत विजय संपादन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विजयासाठी 240 धावांचे आव्हान असताना एल्गारच्या बाणेदार खेळीला किगन पीटरसन (28), डय़ुसेन (40) व बवूमा (नाबाद 23) यांची भरभक्कम साथ लाभली आणि यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दमदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब झाले. वांडरर्सवर दक्षिण आफ्रिकेने भारताला नमवण्याची ही पहिलीच वेळ, हे या लढतीचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले.
पहिल्या दोन्ही सत्रात एकाही चेंडूचा खेळ होऊ न शकल्याने भारताची बरीचशी भिस्त हवामानावरही निर्माण झाली. पण, तिसऱया सत्रात खेळाला सुरुवात झाली आणि दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी अनाठायी धोके स्वीकारण्याऐवजी मजल-दरमजल प्रवासावर भर देत आस्ते-आस्ते विजयाच्या दिशेने मार्गोत्क्रमण केले अन् अंतिमतः एकतर्फी विजयावर थाटात शिक्कामोर्तबही केले.
कर्णधार डीन एल्गारने 188 चेंडूत नाबाद 96 धावांच्या खेळीसह स्वतः नेतृत्वाला साजेसा डाव साकारत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. एल्गार शतकापासून अवघ्या 4 धावांनी वंचित राहिला असला तरी त्याची ही एकाग्रचित्ताने साकारलेली खेळी संघाला विजय मिळवून देण्यात इंचभरही कमी पडली नाही. अगदी स्वतः एल्गारनेच शानदार चौकार फटकावत यजमान संघाच्या या दणकेबाज विजयावर मोहोर उमटवली.
यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने 2 बाद 118 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर एल्गारने करारी बाण्यासह खेळात संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधला. त्याने हवेत उत्तुंग फटके खेळण्याऐवजी मैदानी फटक्यांवर भर दिला आणि हीच बाब सर्वाधिक महत्त्वाची ठरली. एल्गार आपल्या सहकारी फलंदाजांसह एकेरी-दुहेरी धावा चोरत गेला आणि भारतावर दडपण वाढत गेले.
एडन मॅरक्रम व किगन पीटरसन यांच्याकडून समयोचित साथ मिळाल्यानंतर एल्गारने रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनने (40) तिसऱया गडय़ासाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत विजयश्री मिळवून दिली. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी दि. 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.
‘तो’ इतिहास रचण्याची भारताला अद्यापही संधी!
भारताने दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता कसोटी खेळणाऱया प्रत्येक संघाला त्यांच्या भूमीत धोबीपछाड देत मालिकाविजयाचा पराक्रम गाजवला आहे. दक्षिण आफ्रिकन भूमीत त्यांच्याविरुद्ध मालिकाविजयाने भारताला आजवर हुलकावणी दिली असली तरी यंदा हा पराक्रम भारत साधणार का, याची निश्चितच उत्सुकता असेल. तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
पाऊस मदतीला धावून आला होता, पण…
चौथ्या दिवसाच्या खेळात प्रारंभी संततधार पावसाचा व्यत्यय आल्याने पहिल्या दोन सत्रात एकही चेंडू टाकला गेला नव्हता. शिवाय, शुक्रवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी जोहान्सबर्गमध्ये आणखी पावसाची शक्यता वर्तवली गेली होती. पण, प्रत्यक्षात गुरुवारी पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतली आणि तिसऱया सत्रात उर्वरित 122 धावा पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 27.4 षटकांचा खेळ पुरेसा ठरला.
धावफलक
भारत पहिला डाव : सर्वबाद 202
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद 229.
भारत दुसरा डाव : सर्वबाद 266.
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव (टार्गेट 240) : एडन मॅरक्रम पायचीत गो. शार्दुल 31 (38 चेंडूत 6 चौकार), डीन एल्गार नाबाद 96 (188 चेंडूत 10 चौकार), किगन पीटरसन पायचीत गो. अश्विन 28 (44 चेंडूत 4 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन झे. पुजारा, गो. शमी 40 (92 चेंडूत 5 चौकार), तेम्बा बवूमा नाबाद 23 (45 चेंडूत 3 चौकार). अवांतर 25. एकूण 67.4 षटकात 3 बाद 243.
गडी बाद होण्याचा क्रम
1-47 (मॅरक्रम, 9.6), 2-93 (पीटरसन, 27.2), 3-175 (डय़ुसेन, 53.6).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 17-2-70-0, शमी 17-3-55-1, शार्दुल ठाकुर 16-2-47-1, मोहम्मद सिराज 6-0-37-0, रविचंद्रन अश्विन 11.4-2-26-1.
प्रत्येक देशातील भारताचा पहिला कसोटी मालिकाविजय
- देश वर्ष कर्णधार
- न्यूझीलंड 1967-68 मन्सूर अली खान पतौडी
- विंडीज 1971 अजित वाडेकर
- इंग्लंड 1971 अजित वाडेकर
- श्ऱीलंका 1993 मोहम्मद अझरुद्दीन
- बांगलादेश 2000 सौरभ गांगुली
- पाकिस्तान 2004 गांगुली व द्रविड
- झिम्बाब्वे 2005 सौरभ गांगुली
- ऑस्ट्रेलिया 2018-19 विराट कोहली