आयसीसी महिला वनडे विश्वचषक ः भारतासमोर सर्व आघाडय़ांवर सरस खेळ साकारण्याचे लक्ष्य
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
सलामी लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवल्यानंतर भारतीय महिला संघासमोर आज (गुरुवार दि. 10) आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱया साखळी सामन्यात यजमान न्यूझीलंडचे कडवे आव्हान असणार आहे. सेडॉन पार्कवरील खेळपट्टी फलंदाजीला पोषक मानली जाते आणि या पार्श्वभूमीवर, भारतीय संघ फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल, असा होरा आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या लढतीला सकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.
अलीकडेच, द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 4-1 असा एकतर्फी फडशा पाडला. फरक मोठा असला तरी भारतीय संघाला त्यांनी सर्व आघाडय़ांवर चारीमुंडय़ा चीत केले, ही सर्वाधिक चिंतेची बाब होती आणि मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासाठी हीच मोठी डोकेदुखी ठरली आहे. पोवार यांनी अनेक कॉम्बिनेशन राबवून पाहिले. पण, क्वचितच यातील एखादी चाल यशस्वी ठरली.
यापूर्वी, पहिल्या लढतीत भारताने सहज विजय संपादन केला असला तरी पाकिस्तानचा संघ बराच दुबळा होता. त्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा बराच मजबूत आहे. त्यामुळे, भारताला सर्व आघाडय़ांवर सरस खेळ साकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. अलीकडेच, न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय गोलंदाजांना अगदी 270-280 धावांचेही संरक्षण करता आले नव्हते, ही डोळय़ात अंजन घालणारी बाब ठरली.
या स्पर्धेच्या माध्यमातून शफाली वर्मा बहरात परतली, ही भारतीय संघव्यवस्थापनासाठी दिलासादायक बाब आहे. शफालीला स्पर्धेपूर्वी 7 सामन्यात केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आणि उर्वरित 6 सामन्यात ती जेमतेम धावा जमवू शकली होती.
मधल्या षटकात स्ट्राईक रोटेट करु शकणारे फलंदाज नाहीत आणि स्लॉग ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडणारे पॉवर हिटर्स नाहीत, ही भारताची चिंता आहे आणि या दृष्टीने रणनीती ठरवण्याविषयी विचार सुरु आहे. स्मृती मानधना ही भारतीय संघाची फलंदाजीतील मुख्य आधारस्तंभ आहे आणि आजच्या लढतीत तिने मोठी खेळी साकारणे भारतासाठी क्रमप्राप्त असेल.
दीप्ती शर्मा, स्नेह राणा व पूजा वस्त्रकार या अष्टपैलू खेळाडूंकडून भारताला बऱयाच अपेक्षा असणार आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड संघात सोफी डीव्हाईन, सुझी बेट्स, सॅटरवेट, ऍमेलिया केर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू उपलब्ध असल्याने त्यांना नमवणे भारतासाठी अर्थातच आव्हानात्मक असणार आहे.
झुलन गोस्वामी मागील वर्षभरापासून उत्तम बहरात असून तिला मेघना सिंग व पूजा वस्त्रकार यांच्यासारख्या सहकाऱयांकडून दुसऱया बाजूने उत्तम साथ मिळणे तितकेच महत्त्वाचे असेल. राजेश्वरी गायकवाड, राणा व दीप्ती या फिरकीपटूंची गोलंदाजी कशी होईल, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. येथे विजय संपादन केल्यास भारताला मागील वनडे मालिका पराभवाचा हिशेब देखील काही प्रमाणात चुकता करता येईल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, रिचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, झुलन गोस्वामी, रेणुका सिंग.
न्यूझीलंड ः सोफी डीव्हाईन (कर्णधार), ऍमी सॅटरवेट (उपकर्णधार), सुझी बेट्स, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, हेलेय जेन्सन, प्रॅन जोनास, जेस केर, ऍमेलिया केर, फ्रान्सेस मकाय, रोझमेरी मेयर, कॅटे मार्टिन, जॉर्जिया प्लिमर, हन्नाह रोव्ह, लिया ताहूहू.
सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.
कोट्स
‘शफालीने यापूर्वीच स्वतःला सिद्ध केले आहे. ती अव्वल दर्जाची खेळाडू आहे. पण, खराब फॉर्ममधून प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी जावेच लागते. आता ती सराव सत्रामध्ये उत्तम फलंदाजी करत असून एखादी मोठी खेळी सारे चित्र बदलू शकते’,
-अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी