वृत्तसंस्था /इस्लामाबाद :
पाकिस्तानने दिलेल्या अनुमतीनुसार भारतीय दुतावासातील दोन अधिकाऱयांनी गुरुवारी सायंकाळी पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. यावेळी फाशीविरोधातील आव्हान याचिकेवर विचारमंथन करण्यात आले. कुलभूषण जाधव यांच्याकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याच्यादृष्टीने यावेळी बोलणी करण्यात आली.
पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत असलेले कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानने दुसऱयांदा सशर्त कॉन्स्युलर ऍक्सेस मंजूर केला आहे. काही अटी व शर्थी घालून ही भेट घडविण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायोग अधिकारी वकिलांसमवेत परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते. दुतावासातील उपायुक्त गौरव अहलुवालिया आणि चेराकुंग जेलियांग या दोघांनाच भेटीसाठी अनुमती देण्यात आली. मात्र, त्यांच्या भेट आणि चर्चेबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी उशिरा कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार कुलभूषण यांच्या फेरविचार याचिकेवर भारतीय अधिकारी स्वाक्षरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानने दुसऱयांदा भारतीय उच्चायुक्तांना कॉन्स्युलर ऍक्सेसची संधी दिली आहे. जाधव यांना भेटण्यासाठीही पाकिस्तानने काही अटी घातल्या आहेत. या बैठकीत भारतीय अधिकारी आणि जाधव यांना इंग्रजीतच संभाषण करावे लागणार आहे. तसेच या भेटीवेळी तेथे काही पाकिस्तानचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या भेटीमध्ये कुलभूषण जाधव, त्यांचे वकील आणि इस्लामाबादमधील भारताचे दुतावास अधिकारी अपील व फेरविचार याचिका याबाबत बोलणी करणार असल्याचे समजते.
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते.