दावोस / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतीय अर्थव्यवस्थेला एक दिलासादायी संकेत दिले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती तात्पुरती असून येत्या काही वर्षांत त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा ‘आयएमएफ’च्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनी व्यक्त केली आहे.
भारताचा आर्थिक विकास दर सध्या साडेसहा वर्षातील नीचांकी पातळीवर खाली आला आहे. तर, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. याबाबत बोलताना क्रिस्टलिना यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबतही समाधान व्यक्त केले. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यानंतर व्यापार तणाव कमी झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुधारल्याचे दिसून येत आहे. तरीही 3.3 टक्के हा विकास दर जागतिक पातळीवर फारसा चांगला नाही, असे त्या म्हणाल्या. अर्थव्यवस्था अजूनही मंदावल्याचे दिसून येत असले तरी आर्थिक धोरणे अधिक आक्रमक व संरचनात्मक पद्धतीने राबविल्यास उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची स्थिती सुधारू शकते, असे त्यांनी सांगितले.
आफ्रिकन देशांबाबत समाधान व्यक्त
भारतीय बाजारपेठेतील स्थिती संथ असली तरी इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांची अर्थव्यवस्था बऱयापैकी सकारात्मक आहे. तसेच काही आफ्रिकन अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्या तरी मेक्सिकोसारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही, असेही त्यांनी परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केले.