वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रुम
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने शुक्रवारी दक्षिण कोरियाचा 3-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारचा सामना एकतर्फीच ठरला. सामन्यातील 11 व्या मिनिटाला भारताचे खाते मुमताज खानने उगडले. 15 व्या मिनिटाला लालरिनडिकीने भारताचा दुसरा गोल केला. संगीता कुमारीने 41 व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवून दक्षिण कोरियाचे आव्हान एकतर्फीच संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमविलेला नाही. 2013 साली जर्मनीत झालेल्या कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळविले होते. शुक्रवारच्या सामन्यात दक्षिण कोरियाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. मध्यंतरापर्यंत भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली होती. भारतीय संघाच्या आघाडीफळीने आपल्या आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर दक्षिण कोरियाच्या बचावफळीवर शेवटपर्यंत दडपण ठेवले. आता रविवारी भारताचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे आतापर्यंत तीनवेळा विजेतेपद मिळविणारा बलाढय़ हॉलंड आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील विजयी संघाबरोबर भारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.