हॉलंडने भारतीयांना प्रवेशबंदी केल्यामुळे घडला प्रकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या दहा सदस्यीय मल्लांच्या पथकाला बल्गेरियातील सोफिया येथे जाण्यापासून रोखण्यात आले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी ही शेवटची स्पर्धा आहे. नेदरलँड्स (हॉलंड) सरकारने भारतातून येणाऱया प्रवाशांना प्रवेशबंदी केली असल्याने हा प्रकार घडला आहे.
6 ते 9 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारतीय पथकात फ्रीस्टाईल मल्ल अमित धनकर (74 किलो गट), सत्यवर्त कादियान (97 किलो), सुमित मलिक (125 किलो) यांचा तसेच सीमा (50 किलो), निशा (68 किलो), पूजा (76 किलो) या महिला मल्लांचा समावेश होता. भारतातील कोव्हिड 19 ची परिस्थिती अतिशय भयावह असल्याने नेदरलँड्सने भारतातून येणाऱया प्रवाशांना व भारतीय नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. फ्रीस्टाईल मल्लांशिवाय ग्रीको रोमन स्पेशालिस्ट दीपांशू (97 किलो) व पुरुषांच्या फ्रीस्टाईलचे प्रशिक्षक जगमिंदर सिंग यांचाही या पथकात समावेश होता.
भारतीय संघ दिल्लीहून हॉलंडमधील ऍम्स्टरडॅमला प्रयाण करणार होता आणि तेथून दुसऱया विमानाने ते सोफियाकडे रवाना होणार होते. पण भारतीय प्रवाशांवर बंदी झाल्याचे समजताच केएलएम एअरलाईन्सने ऍम्स्टरडॅमची त्यांची तिकिटे रद्द केली आणि त्याची माहिती भारतीय कुस्ती फेडरेशनला (डब्ल्यूएफआय) दिली. एक 17 सदस्यीय स्वतंत्र कुस्ती पथक एअर फ्रान्सच्या विमानाने दिल्लीहून मुंबई व पॅरिसमार्गे सोफियाकडे प्रयाण करणार आहे. ज्यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत, त्या गटाला एअर फ्रान्सच्या विमानाने 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी पाठविण्याचे प्रयत्न डब्ल्यूएफआय करीत आहे. प्रवेशबंदीचा निर्णय होण्याआधीच विनेश फोगट (53 किलो) व तिचे वैयक्तिक प्रशिक्षक वोलर ऍकोस ट्रेनिंगसाठी सोफियाला पोहेचले आहेत.