पथकातील सर्व खेळाडूंची कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह, क्वारन्टाईन असताना सरावाची परवानगी
सिडनी / वृत्तसंस्था
आव्हानात्मक दौऱयासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंनी शनिवारपासून हलक्या सरावाला सुरुवात केली आहे. पथकातील सर्व सदस्यांचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांना सरावाला लगोलग परवानगी मिळाली. ऑस्ट्रेलियात दाखल होताच या खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती.
अलीकडेच युएईमध्ये संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंनी शनिवारी सराव सत्रात प्रामुख्याने सहभाग घेतला. यात हार्दिक पंडय़ा, पृथ्वी शॉ व मोहम्मद सिराज यांचा समावेश राहिला. सिडनी ऑलिम्पिक पार्कमधील ब्लॅकटाऊन इंटरनॅशनल स्पोर्टस पार्कमध्ये खेळाडूंचा सराव सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीटर हँडलवरुन आऊटडोअर सराव व जिम सेशनची काही छायाचित्रे पोस्ट केली.
फिरकीपटू कुलदीप यादव, मध्यमगती गोलंदाज उमेश यादव, अष्टपैलू रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर व कसोटी संघातील भक्कम आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा वॉर्मअप करताना दिसून आले तर भारताचा जलद गोलंदाजीतील नवा चेहरा टी. नटराजन, दीपक चहर हे देखील छायाचित्रात समाविष्ट होते.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारन्टाईन असेल. मात्र, क्वारन्टाईन कालावधीत त्यांना सरावाची मुभा मिळाली असल्याने याचा त्यांना सदुपयोग करुन घेता येईल. लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने देखील सहकारी फिरकीपटू कुलदीप यादवसह काही छायाचित्रे ट्वीट केली. भारतीय संघ या ऑस्ट्रेलिया दौऱयात 3 वनडे, 3 टी-20 व 4 कसोटी सामने खेळणार आहे. दि. 27 नोव्हेंबर रोजी पहिल्या टी-20 सामन्याने या मालिकेला प्रारंभ होत आहे.