वृत्तसंस्था / गोंडोमेर :
पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक पात्रतेसाठीच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला संघांना आपल्या पात्रतेसाठी आता केवळ एका विजयाची जरूरी आहे. आणखी एक विजय मिळविला तर भारतीय टे.टे संघ ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होतील.
या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या पुरूष टे.टे. संघाने लक्झमबर्गचा महिला संघाने स्वीडनचा पराभव केला. शुक्रवारी भारतीय पुरूष संघाची महत्त्वाची लढत स्लोव्हेनियाशी होत आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली तर भारतीय टे.टे. संघाला ऑलिंपिकचे तिकीट निश्चित मिळेल आणि हा भारतीय टे.टे.चा नवा ऑलिंपिक इतिहास ठरेल.
भारत आणि लक्झमबर्ग यांच्यातील लढतीत भारताच्या शरथ कमल आणि हरमित देसाई या जोडीने सलामीच्या दुहेरी सामन्यात लक्झमबर्गच्या मिचेली आणि ग्लॉड याचा 11-9, 16-14, 11-6 असा पराभव केला. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात लक्झबर्गच्या मॅलेडेनोव्हिकचा जी सत्येतनने 8-11, 9-11, 11-3, 13-11, 11-6 असा पराभव केला. या सामन्यात सत्येतनला पहिले दोन गेम गमवावे लागले होते. अन्य एका सामन्यात शरथ कमलने ग्लॉडचा 11-3, 11-3, 12-14, 11-5 असा पराभव करत आपल्या संघाला लक्झमबर्गवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून दिला. स्लोव्हेनियाने इराणचा 3-1 असा पराभव करत शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात भारताने स्वीडनचा 3-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. या लढतीतील निर्णायक एकेरी सामन्यात भारताच्या अर्चना कामतने स्वीडनच्या बर्जस्ट्रॉमचा 11-8, 8-11, 9-11, 11-7, 13-11 असा पराभव केला. भारताच्या मनिका बात्राने आपले दोन्ही एकेरीचे सामने जिंकताना स्वीडनच्या अनुक्रमे बर्जस्ट्रॉम आणि केलबर्ग यांचा 3-1 व 3-2 अशा फरकाने पराभव केला. भारतीय महिला संघाचा पुढील सामना बलाढय़ रूमानियाशी होत आहे.