वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या सप्टेंबर महिन्यात फिनलँडविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने शुक्रवारी पाच जणांचा भारतीय टेनिस संघ जाहीर केला असून दुहेरीसाठी रोहन बोपण्णाने आपले स्थान शाबूत राखले आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्व गट-1 मधील भारत आणि फिनलँड ही लढत 17-18 सप्टेंबरला आयोजित केली आहे. त्या लढतीसाठी भारतीय डेव्हिस चषक संघामध्ये प्रज्नेश गुणेश्वरन, सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन यांची एकेरीकरिता निवड झाली आहे. या संघाचा रोहित राजपाल हा बहिस्थ कर्णधार आहे तर झिशान अली प्रशिक्षक आहे. या लढतीत रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण हे दुहेरीत खेळणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बोपण्णा आणि डी. शरण ही जोडी मानांकनात खालच्या क्रमांकावर असल्याने ती पात्र ठरू शकली नाही.
या लढतीसाठी फिनलँड संघामध्ये एटीपी क्रमवारीत 69 व्या स्थानावर असलेला इमिल रुसुव्होरीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे हेन्री कोंटीनेन, हॅरी हेलिओव्हेरा यांनाही स्थान देण्यात आले आहे. या लढतीतील विजयी संघ 2022 च्या डेव्हिस चषक पात्रता स्पर्धेत खेळेल तर पराभव झालेल्या संघाला पुढील वर्षी विश्व गट-1 मधील स्थान राखण्यासाठी प्लेऑफ लढतीत खेळावे लागेल.