आफ्रिकेतील बाजारात तांदूळ विकतोय चीन : धोरणात बदल करण्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताला आता आफ्रिकन बाजारपेठेत चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. तांदळाचा आयातदार असलेला चीन आता निर्यातदार झाला असून स्वस्त दरात तांदळाचा स्वतःचा जुना साठा तो बाजारपेठेत आणत आहे. आफ्रिकन देश बिगरबासमती तांदळासाठी भारतावर अवलंबून राहिले आहेत. पण या देशांमध्ये चीनचा तांदूळ पोहोचू लागल्याने भारतासमोर नवी प्रतिस्पर्धा उभी राहिली आहे. चीनने मोठय़ा प्रमाणात आफ्रिकन बाजारपेठेत स्वतःचा तांदूळ उतरविला आहे. चीनचे नागरिक ‘स्टिकी राइस’ खाणे पसंत करतात, पण भांडारात ठेवलेला तांदूळ जुना झाल्यावर त्यातील दर्जा कमी होतो. याच कारणामुळे चीन स्वतःच्या गोदामांमध्ये पडून राहिलेला जुना तांदूळ विदेशात विकत असल्याचे कृषी आणि खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
मागील 6 महिन्यांमध्ये चीनच्या शासकीय गोदामांमधून सुमारे 30 लाख टन तांदळाची निर्यात झाली असून त्याच्या तांदळाचा साठा सातत्याने आफ्रिकेतील बाजारपेठेत पोहोचत आहे. भारत सुमारे 400 डॉलर्स प्रतिटन दरावर बिगरबासमती तांदळाची निर्यात करतो. पण चीन याहून अत्यंत कमी दरात तांदूळ उपलब्ध करत आहे. अशा स्थितीत भारतासमोर स्पर्धेत टिकून राहणे आव्हानात्मक ठरत चालले आहे. भारतात धान्याचा हमीभाव अधिक असल्याने तांदळाचा दर अधिक आहे. याच कारणामुळे यंदा बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाल्याची माहिती निर्यातदाराने सांगितले आहे.
निर्यातीत लक्षणीय घट
चालू आर्थिक वर्षात भारताची बिगरबासमती तांदळाची निर्यात पहिल्या 8 महिन्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 35 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घटली आहे. 2019 च्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत भारताने 9028.34 कोटी रुपयांची बिगरबासमती तांदळाची निर्यात केली आहे. तर 2018 च्या याच कालावधीत 14059.51 कोटी रुपयांच्या तांदळाची निर्यात झाली होती. सरकारने एफसीआयच्या गोदामांमध्ये पडून राहिलेल्या जुन्या तांदळाचा साठा चीनच्या धर्तीवर बाजारपेठेत आणावा, अशी सूचना तज्ञाने केली आहे.
सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार
चीन 300 ते 320 डॉलर्स प्रतिटनाच्या दराने तांदळाची निर्यात करत आहे. भारत आणि चीन यांच्यातील किमतीत मोठा फरक आहे. भारत जगाचा सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार असून दुसऱया क्रमांकावर थायलंड, तिसऱया स्थानी व्हिएतनाम तर चौथ्या स्थानी पाकिस्तान आहे. पण भारताकडून होणारी बिगरबासमती तांदळाची निर्यात कमी होत चालल्याने आघाडीचे स्थान कायम राखणे अवघड ठरले आहे.