विश्व चषक स्टेज 3 तिरंदाजी – मिश्र सांघिक, महिला रिकर्व्ह, वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात पटकावली पदके
वृत्तसंस्था/ पॅरिस
येथे सुरू असलेल्या विश्व चषक स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी शानदार प्रदर्शन करीत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. अतानू दास-दीपिका कुमारी यांनी मिश्र सांघिकमध्ये, महिला संघाने रिकर्व्हमध्ये तर अभिषेक शर्माने वैयक्तिक कंपाऊंड विभागात सुवर्णयश मिळविले.
रविवारी दीपिका व अतानू या दाम्पत्याने 0-2 अशी पिछाडी भरून काढत नेदरलँड्सच्या सेफ व्हान डेन बर्ग व गॅब्रिएला स्क्लोएसर यांच्यावर 5-3 अशी मात करीत भारताला या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण मिळवून दिले. त्याआधी दीपिका कुमारी, अंकिता भगत, कोमलिका बारी या महिला रिकर्व्ह संघाने मेक्सिको संघाचा पराभव करून सुवर्ण मिळविले होते. गेल्या आठवडय़ात भारतीय रिकर्व्ह संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यात यश आले नव्हते, ती निराशा मागे टाकत या स्पध्sा&त यश मिळविले. दीपिकाने मिश्र दुहेरीत मिळविलेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. याआधी तिने 5 रौप्य व 3 कांस्यपदके पटकावली आहेत. 2016 मध्ये अंटाल्या येथे झालेल्या विश्व चषक स्पर्धेत दीपिकाने अतानूसमवेत शेवटची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना कोरियन जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शनिवारी अभिषेक वर्माने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीत जेतेपद मिळवित भारताचे सुवर्णपदकाचे खाते खोलले होते.
मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत पाचव्या मानांकित अतानू-दीपिका यांनी पहिला सेट 37-38 असा गमविला. 0-2 अशा पिछाडीनंतर दीपिकाने शानदार प्रदर्शन करीत तिसरा सेट 39-37 असा जिंकत डच जोडीवर 4-2 अशी बढत घेतली. चौथ्या सेटमध्ये दोन्ही जोडय़ात जोरदार चुरस लागली होती. निम्म्यावर असताना दोघांनी 19-19 बरोबरी साधली होती. मात्र अखेरीस अतानूने 10 व दीपिकाने 9 गुण घेत ही लढत 5-3 अशी जिंकून सुवर्ण पटकावले. महिला रिकर्व्ह संघानेही मेक्सिकोवर 5-1 अशा एकतर्फी फरकाने मात केली होती. दोन महिन्यापूर्वी याच संघाविरुद्ध ग्वाटेमाला सिटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्ण मिळविता आले नव्हते. पण यावेळी शानदार प्रदर्शन करीत ती कसर भरून काढली.
शनिवारी अभिषेक वर्माने कंपाऊंड प्रकारात अमेरिकेच्या क्रिस शॅफला शूटऑफमध्ये पराभवाचा धक्का देत सुवर्ण पटकावले होते. दोघांमध्ये अतिशय चुरस पहावयास मिळाली. नियमित पाच फेऱया झाल्यानंतर दोघांनी 148 गुण मिळविले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूटऑफमध्ये पाचव्या मानांकित शॅफने 9 तर अभिषेकने पूर्ण 10 गुण घेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. वर्माने त्याआधीच्या फेरीत रशियाच्या अँटोन बुलाएव्हचा 146-138 असा पराभव केला होता. अभिषेकने 2015 मध्ये रॉकलॉ येथे झालेल्या विश्व चषक स्टेज 3 स्पर्धेत शेवटचे पदक मिळविले होते.