व्हिसा रोखल्याने प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांचे प्रयाण लांबणीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली-पुणे
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारताचे 13 नेमबाजांचे पथक सुमारे अडीच महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी मंगळवारी दिल्लीहून झाग्रेबकडे रवाना झाले. मात्र पिस्तूल नेमबाजीचे प्रमुख प्रशिक्षक पॅव्हेल स्मिरनोव्ह यांचा व्हिसा अर्ज क्रोएशियाच्या दूतावासाने रोखल्याने त्यांना पथकासोबत जाता आले नाही. क्रोएशियाच्या अंतर्गत मंत्रालयाकडून अजून हिरवा कंदिल मिळाला नसल्याने त्यांना थांबावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.
एनआरएआयने ऑलिम्पिक मोहिमेसाठी एकूण सात प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती, त्यात रशियाच्या 67 वर्षीय स्मिरनोव्ह यांचाही समावेश आहे. 13 नेमबाजांसह या सर्व प्रशिक्षकांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) करणार आहे. क्रोएशियाच्या भारतातील दूतावासाने पथक प्रयाण करण्याच्या काही तास आधी मंगळवारी सकाळी स्मिरनोव्ह यांचा व्हिसा रोखला असल्याचे एनआरएआयला कळविले. थेट चार्टर्ड विमानाने पथक झाग्रेबकडे रवाना होणार होते. ‘ स्मिरनोव्ह यांचा व्हिसा मिळाल्यावर ताबडतोब त्यांना झाग्रेबकडे पाठविले जाईल,’ असे एनआरएआयचे सरचिटणीस राजीव भाटिया यांनी सांगितले.
भारतीय नेमबाजांना झाग्रेबमध्ये गेल्यानंतर हॉटेलमध्येच सात दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. नंतर झाग्रेबमध्ये ट्रेनिंग घेत असताना दोन स्पर्धांमध्येही ते भाग घेणार आहेत. ट्रेनिंगचा कालावधी संपल्यानंतर तेथूनच ते टोकियोकडे प्रयाण करणार आहेत. प्रयाण केलेले नेमबाज ः पिस्तूल नेमबाज-सौरभ चौधरी, मनू भाकर, अभिषेक वर्मा, यशस्विनी सिंग, राही सरनोबत. रायफल नेमबाज-दीपक कुमार, दिव्यांश सिंग पन्वर, संजीव राजपूत, ऐश्वर्य प्रताप तोमर, अपूर्वी चंडेला, अंजुम मोदगिल, इलावेनिल वलरिवन, तेजस्विनी सावंत. प्रशिक्षक-दीपाली देशपांडे, सुमा शिरूर, मनोज कुमार, ओलेग मिखाइलोव्ह, वेद प्रकाश पिलानिया, दीपक कुमार दुबे. याशिवाय खासगी प्रशिक्षक राकेश मनपत, सहा जणांचे फिजिओथेरपिस्ट पथक आणि स्ट्रेंग्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक.