वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय नौकानयनपटूंच्या युरोपमध्ये आयोजिलेल्या सरावासाठी क्रीडा मंत्रालयाने 73.14 लाख रुपये खर्च करण्याचे घोषित केले आहे. युरोपमध्ये होणाऱया या सराव प्रशिक्षण शिबिरात भारताचे नौकानयनपटू विष्णू सर्वांनंद (लेसर स्टँडर्ड), के. सी. गणपती आणि वरुण ठक्कर (स्किफ 49 ईआर) यांचा समावेश राहिल. क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेल (एमओसी) ने शुक्रवारी या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
नौकानयनपटूंच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिराकरिता एकूण 73.14 लाख रुपये खर्च करावे लागणार असून या सराव शिबिरात चार ऍथलिट्सचा समावेश आहे. ओमानमध्ये झालेल्या मुसानेह खुल्या नौकानयन स्पर्धेतून सर्वानंदने टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित केले आहे. सर्वानंदला माल्टामध्ये 28 दिवसांसाठी त्याच्या प्रशिक्षकाकडून खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याशिवाय मिशन ऑलिम्पिक सेलने पोर्तुगालमधील व्हिलामोरा येथे 14 दिवसांच्या प्रशिक्षण सरावाला अधिकृत मान्यता दिली आहे. या प्रशिक्षणानंतर भारतीय स्पर्धक मेडेमब्लिक रेगाट्टा स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्यासाठी 26.46 लाख रुपयांच्या आर्थिक बजेटला अधिकृत मंजुरी भारतीय क्रीडा प्राधिकारण मंडळाने दिली आहे.
ओमानमध्ये मुसानेह खुल्या नौकानयन स्पर्धेनंतर कुमाननचा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम (टॉप्स) मध्ये समावेश करण्यात आला असून त्याच्यासाठी स्पेनमधील ग्रेन कॅनेरिया येथे 28 दिवसांचे प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले आहे. भारतीय महिला नौकानयनपटू कुमानन ओमानमध्ये होणाऱया मेडेमब्लिक रेगाट्टा स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यानंतर ती हंगेरीतील स्पर्धेत सहभागी होईल. कुमानन साठी मिशन ऑलिम्पिक सेलने 20.54 लाख रुपयांची तरतूद केली असून यामध्ये तिच्या हवाई प्रवास खर्चाचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे के. सी. गणपती, आणि वरुण ठक्कर यांचाही टॉप्सच्या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. गणपती आणि ठक्कर यांच्यासाठी पोर्तुगालमध्ये 28 दिवसांकरिता प्रशिक्षण सराव शिबिर राहिला. त्यानंतर ते मेडेमब्लिक रेगाट्टा स्पर्धेत भाग घेतील. गेल्या महिन्यात भारताच्या चार नौकानयनपटूंनी दर्जेदार कामगिरी करत नवा इतिहास घडविताना ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदाच नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.